IPL 2025 – वानखेडेवर मोठा भाऊ जिंकला, पंडय़ा बंधूंच्या संघर्षात बंगळुरूचा वानखेडेवर दहा वर्षांनी विजय

क्षणाक्षणाला थरारक वळणं घेत असलेल्या ब्लॉकबस्टर सामन्यात कृणाल आणि हार्दिक या पंडय़ा बंधूंच्या चेंडू-फळीच्या संघर्षात मोठय़ा भावाने बाजी मारली. कृणालने विजयाच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या मुंबईचे  शेवटच्या षटकात तीन विकेट काढत बंगळुरूला तब्बल दहा वर्षांनंतर वानखेडेवर विजय मिळवून दिला. बंगळुरूने तिसऱ्या विजयाची नोंद करत गुणतालिकेत तिसरे स्थान कायम राखले, तर चौथ्या पराभवामुळे मुंबई आठव्याच स्थानी कायम राहिली.

वानखेडेवर पंडय़ांची भाऊबंदकी

बंगळुरूने 12 षटकांत मुंबईला 99 धावांवर रोखत सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. सामना मुंबईच्या हातून निसटल्याचेच दृश्य होते; पण कर्णधार हार्दिक पंडय़ा येताच त्याने आपल्या पहिल्या 7 चेंडूंवर 6, 4, 6, 4, 0, 6, 6 अशी फटकेबाजी करत 32 धावा चोपल्या आणि 15 चेंडूंतच 52 धावांची सुसाट भागी करत मुंबईला अनपेक्षितपणे विजयी ट्रकवर आणले. हार्दिकने डावातील 15 व्या षटकात कृणालला सलग दोन षटकार खेचत खेळात आपली ताकद दाखवली होती. 89 धावांची झंझावाती भागी केल्यानंतर हार्दिक-तिलकची जोडी फुटली आणि मुंबई अडचणीत आली. हार्दिकने 42, तर तिलक वर्माने 56 धावा केल्या. त्यानंतर कृणालने आपल्याला झालेल्या फटकेबाजीचा वचपा काढत डावातील शेवटचे षटक गोलंदाजी करताना सलग चेंडूंवर मिचेल सॅण्टनर व दीपक चहर यांची विकेट काढली आणि विजयी घोडय़ावर स्वार होण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंबईला खाली उतरवले. आणि पाचव्या चेंडूवर नमन धीरचीही विकेट काढत बंगळुरूच्या 12 धावांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. कृणालने शेवटच्या षटकात विजयापासून 19 धावा दूर असलेल्या मुंबईचे स्वप्न उदध्वस्त करत केवळ 6 धावाच दिल्या. त्याने 54 धावांत 4 विकेट घेतल्या, तर 64 धावांच्या खेळीनंतर बंगळुरूचे प्रभावीपणे नेतृत्व करणारा रजत पाटीदार ‘सामनावीर’ ठरला.

कोहलीकडून बुमराचे आदरातिथ्य

विराट कोहलीने आज आपल्या लाडक्या आणि क्रिकेटविश्वातील अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराचे आयपीएलचे पुनरागमन षटकारानिशी केले. त्याने बुमराच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर खणखणीत षटकार खेचत त्याचे अनोखे आदरातिथ्य केले. आज वेगळय़ाच मूडमध्ये असलेल्या कोहलीने फिल सॉल्टची विकेट गेल्यानंतर देवदत्त पडिक्कलसह 91, तर कर्णधार रजत पाटीदारसह 58 धावांची भागी रचून बंगळुरूची धाव 200च्या दिशेने नेली. विराटने 42 चेंडूंच्या खेळीत 2 षटकार आणि 8 चौकार ठोकत 67 धावा केल्या. रजतनेही 32 चेंडूंत 4 षटकार आणि 5 चौकार लगावत 64 धावा चोपल्या. तळाला जितेश शर्माने 4 षटकारांचा वर्षाव करत नाबाद 40 धावा ठोकत बंगळुरूला 221 धावांपर्यंत नेले.

कोहलीच्या 13 हजार धावा

विराट कोहलीचे दुसरे नाव विक्रम आहे. त्याची प्रत्येक धाव काहीना काही विक्रम करतेच. आज त्याने 17 वी धाव काढताच 386 व्या डावात टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 13 हजार धावांचा टप्पा ओलांडला. तो अशी कामगिरी करणारा पहिला हिंदुस्थानी, तर क्रिकेट जगतातील पाचवा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल (14562), ऍलेक्स हेल्स (13610), शोएब मलिक (13557) आणि कायरन पोलार्ड (13537) यांनी हा पराक्रम केला आहे.