
इंडियन प्रीमियर लीगच्या 18व्या हंगामातील दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघामध्ये रंगला आहे. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात एसआर एचने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. हैदराबादने 20 षटकांमध्ये 286 धावा चोपल्या. राजस्थानचे सगळेच गोलंदाज महागडे ठरले. त्यातल्या त्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याची हैदराबादच्या फलंदाजांनी चांगलीच धुलाई केली. त्याचा चार षटकांमध्ये हैदराबादने 76 धावा वसूल केले. त्याला एकही विकेट घेता आली नाही. आर्चर आयपीएल इतिहासामध्ये चार षटकांमध्ये सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे. याआधी हा लाजिरवाणा विक्रम गुजरात टायटन्सच्या मोहित शर्मा याच्या नावावर होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध खेळताना त्याने चार षटकांमध्ये 73 धावा दिल्या होत्या. आता हा नकोसा विक्रम आर्चरच्या नावावर जमा झाला आहे.