KKR VS PBKS – पावसामुळे कोलकाता आणि पंजाब यांच्यातील सामना रद्द, दोन्ही संघांना किती मिळाले पॉईंटस्?

कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील ईडन गार्डन्सवर सुरू असलेला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. पंजाबने कोलकातासमोर चार विकेट्स गमावून 202 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याला प्रत्युत्तर म्हणून कोलकाता संघ मैदानात आला आणि त्यांना फक्त एकच षटक खेळता आले. कोलकाताने पहिल्याच षटकात सात धावा काढल्या. यानंतर पावसामुळे सामना रद्द करण्यात आला आणि दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आले.

पंजाब आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात पीबीकेएसने नाणेफेक जिंकली आणि संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कोलकाता संघ प्रथम गोलंदाजी करायला आली. पंजाबच्या फलंदाजांनी डावाची सुरुवात वादळी पद्धतीने केली आणि कोलकातासमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले. पंजाबकडून प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सलामीला आले. पंजाबने प्लेऑफमध्ये एकही विकेट न गमावता 56 धावा केल्या. प्रियांश आणि प्रभसिमरन या जोडीने पंजाबला 100 धावांचा टप्पा ओलांडण्यास मदत केली. 12 व्या षटकात आंद्रे रसेलने ही भागीदारी मोडली. प्रियांश आर्यने 35 चेंडूत 69 धावांची तुफानी खेळी केल्यानंतर बाद झाला.

प्रियांश बाद झाल्यानंतर पंजाबने 15 व्या षटकात आपला दुसरा बळी गमावला आणि मॅक्सवेलही 17 व्या षटकात पॅव्हेलियनमध्ये परतला. कोलकाताच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये पुनरागमन केले. कोलकाताच्या गोलंदाजांनी शेवटच्या षटकांमध्ये चांगली गोलंदाजी केली आणि धावांना ब्रेक लावला. ज्यामुळे पंजाबला 20 षटकांत चार गडी गमावून 201 धावा करता आल्या. या डावात प्रभसिमरनने 49 चेंडूत सर्वाधिक 83 धावा केल्या.