
महेंद्रसिंह धोनी मैदानात असूनही सलग चौथ्या सामन्यात चेन्नईला धावांचा पाठलाग करण्यात अपयश आले आणि त्यांना पराभवाच्या चौकाराची नामुष्की सहन करावी लागली. 18 वर्षीय प्रियांश आर्यच्या 42 चेंडूंतील 103 धावांच्या झुंजार शतकाने पंजाब किंग्जला 219 धावांपर्यंत नेले होते, तर या धावांचा पाठलाग करताना धोनीची चेन्नई 5 बाद 201 धावांपर्यंतच मजल मारू शकली. पंजाबने चेन्नईचा 18 धावांनी पराभव करत आपणच सुपर किंग्ज असल्याचे दाखवून दिले.
पंजाबचे प्रभसिमरन सिंह(0), श्रेयस अय्यर (9), मार्कस स्टॉयनिस (4), नेहाल वधेरा (9) आणि ग्लेन मॅक्सवेल (1) हे फलंदाज झटपट बाद झाले, तरीही प्रियांश आर्यने मुल्लानपूरच्या स्टेडियममध्ये 9 षटकार आणि 8 चौकारांची आतषबाजी करत 39 चेंडूंतच शतक साजरे करण्याचा पराक्रम केला. अर्धा संघ 83 धावांत गारद झाल्यानंतरही प्रियांशने एकहाती फटकेबाजी करत संघाला 14 व्या षटकात दीडशेचा टप्पा गाठून दिला. यात त्याचा वाटा 103 धावांचा होता. तो बाद झाल्यावर शशांक सिंह (52) आणि माकाx यान्सनने (34) सातव्या विकेटसाठी 65 धावांची अभेद्य भागी रचत पंजाबला 219 पर्यंत नेले. प्रियांशने यंदाच्या आयपीएलमधला दुसरा शतकवीर ठरला. गेल्या 21 सामन्यांत केवळ इशान किशनच शतक ठोकू शकला होता.
पंजाबच्या 220 धावांचा पाठलाग करताना रचिन रवींद्र (36) आणि डेव्हन कॉन्वेने (69) 61 धावांची सलामी दिली. मग शिवम दुबेसह कॉन्वेने 89 धावांची भागी रचत चेन्नईला 151 पर्यंत नेले. 25 चेंडूंत 69 धावांचे लक्ष्य असताना धोनी मैदानात उतरला, पण तो आजही त्याची फटकेबाजी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. त्याने 12 चेंडूंत 27 धावा ठोकल्या. सलग चौथ्या सामन्यांत धोनीचे प्रयत्न संघाला विजयाचे फिनिश करून देण्यात अपयशी ठरले आहेत.
आयपीएल गुणतालिका
संघ सा. वि. प. गुण नेररे
दिल्ली 3 3 0 6 1.257
गुजरात 4 3 1 6 1.031
बंगळुरू 4 3 1 6 1.015
पंजाब 4 3 1 6 0.289
लखनौ 5 3 2 6 0.078
कोलकाता 5 2 3 4 – 0.056
राजस्थान 4 2 4 2 – 0.185
मुंबई 5 1 4 2 – 0.010
चेन्नई 5 1 4 2 – 0.889
हैदराबाद 5 1 4 2 – 1.629
टीप –सा – सामना, वि. – विजय,
प. – पराभव, नेररे –नेट रनरेट
(ही आकडेवारी चेन्नई–पंजाब सामन्यापर्यंतची आहे.)