मुल्लानपूरला चहलचा कहर, पंजाबचा कोलकात्यावर 16 धावांनी सनसनाटी विजय

टी-20च्या चौकार-षटकारांच्या जमान्यात आज चक्क गोलंदाजांचा कहर पाहायला मिळाला. कोलकात्याने पंजाबचा डाव 15.3 षटकांत गुंडाळल्यानंतर युझवेंद्र चहलच्या फिरकीचा कहर कोलकात्याच्या दिग्गज फलंदाजांना सहन करावा लागला. चहलने 28 धावांत 4 विकेट टिपताना या कमी धावसंख्येच्या थरारात पंजाबने कोलकात्याचा डाव अवघ्या 95 धावांत गुंडाळत 16 धावांचा विजय नोंदवला.
चहल-यान्सनची कमाल

विजयाचे 112 धावांचे माफक आव्हान कोलकाता सहज गाठणार, हे सर्वांचे मत होते, पण गोलंदाजांसाठी नंदनवन ठरलेल्या खेळपट्टीवर फलंदाजांना एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागला. डिकॉक (2) आणि नरीन (5) हे सलामीवीर 8 चेंडूंत बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे (17) आणि अंगक्रिश रघुवंशीने (37) तिसर्या विकेटसाठी 55 धावांची भागी करून सामना कोलकात्याच्या बाजूने वळवला होता. मात्र चहलने या दोघांना बाद करून सामनाच फिरवला. या यशानंतर चहल आणि यान्सनने मिळून कोलकात्याचे बारा वाजवले. विजयापासून 18 धावा दूर असताना मैदानात आंद्रे रसल होता. तरीही तो काही करू शकला नाही आणि यान्सनने त्याची विकेट उडवत कोलकात्याचीही विकेट काढली. चहलने 4 विकेट तर यान्सनने 17 धावांत 3 विकेट टिपले.

राणाची सुसाट सुरूवात

पंजाबला प्रियांश आर्याने झंझावाती सलामी देण्याचा प्रयत्न केला. 12 चेंडूंत 22 धावा ठोकल्यानंतर 39 धावांवर सलामीची जोडी फुटली. हर्षित राणाने भन्नाट मारा करताना आर्याला बाद केले. त्यानंतर कर्णधार श्रेयस अय्यरला शून्यावर बाद करत राणाने खळबळ माजवली. आघाडीच्या तिघांना राणानेच बाद केले. मग पंजाबच्या डावाला कुणाचाच आधार लाभला नाही. एकापाठोपाठ एक फलंदाज बाद करत कोलकात्याने पंजाबची 8 बाद 86 अशी अवस्था केली. तेव्हा शशांक सिंगने 18 धावा काढून संघाला 109 पर्यंत नेले आणि तो बाद झाल्यावर त्यांचा डाव 111 धावांवर आटोपला.