
पंजाब किंग्जने लखनौ सुपरजायंट्सच्या घरी जाऊन त्यांचीच ‘मेहमाननवाजी’ करत आयपीएलच्या अठराव्या सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. लखनौच्या 172 धावांच्या आव्हानाचा 22 चेंडू आधीच 8 विकेटनी फडशा पाडत पंजाब किंग्जने विजयाचे बल्ले बल्ले केले.
पंजाबच्या सर्वच गोलंदाजांनी अचूक आणि प्रभावी मारा करत लखनौला 171 धावांवर रोखल्यानंतर प्रभसिमरन सिंह (69) आणि श्रेयस अय्यर-नेहाल वढेरा यांच्या 67 धावांच्या घणाघाती भागीने पंजाबला 16.2 षटकांत विजयी लक्ष्य गाठून दिले. प्रभसिमरनने अवघ्या 34 चेंडूंत 3 षटकार आणि 9 चौकार खेचत 69 धावा चोपून काढल्या. त्याने कर्णधार श्रेयस अय्यरसह 84 धावांची भागी रचत पंजाबचा विजय निश्चित केला, तर अय्यर आणि वढेराने 67 धावांची भर घालत पंजाबच्या विजयाची मालिका कायम राखली.
पूरनचा पुन्हा जलवा
गेल्या दोन्ही सामन्यांत 70 आणि 75 धावांची खेळी करणाऱ्या निकोलस पूरनचा जलवा पंजाब किंग्जविरुद्धही दिसला. त्याने 30 चेंडूंत 2 षटकार आणि 3 चौकारांची फटकेबाजी करत 44 धावांची खेळी केली. अर्शदीप सिंहने पहिल्याच षटकात मिचेल मार्शला टिपले. त्यानंतर एडन मार्करमने 28 धावा ठोकल्या. लॉकी फर्ग्युसनने त्याचा त्रिफळा उडवला. मग ग्लेन मॅक्सवेलने ऋषभ पंतला (2) बाद करत लखनौची 3 बाद 35 अशी बिकट अवस्था केली. तेव्हा पूरन लखनौसाठी उभा राहिला. त्याने आयुष बदोनीसह 54 धावांची भागी केली.
बदोनी–समदचा झंझावात
पूरन बाद झाल्यावर डेव्हिड मिलर (19) मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. 16 षटकांत लखनौच्या फलकावर केवळ 119 धावा लागल्या होत्या. तेव्हा बदोनी आणि अब्दुल समद यांनी 21 चेंडूंत 57 धावा फटकाविताना 3 षटकार आणि 3 चौकार खेचले. यान्सनने डावातील 19 व्या षटकांत दोघांच्या फटकेबाजीला रोखत केवळ 8 धावा केल्या. मग पहिल्याच षटकात मार्शला बाद करणाऱ्या अर्शदीपने डावाच्या शेवटच्या षटकात बदोनी आणि समदची विकेट काढत लखनौच्या धावांना 171 वर रोखले. अर्शदीपने 43 धावांत सर्वाधिक 3 विकेट टिपल्या. तसेच लॉकी फर्ग्युसन, ग्लेन मॅक्सवेल, मार्को यान्सन आणि युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एकेक विकेट घेतली.
श्रेयस अय्यर नाबाद 149
गेल्या सामन्यात 97 धावांवर नाबाद असलेल्या श्रेयसने आजही 52 धावांची नाबाद खेळी करत दोन सामन्यांत नाबाद 149 धावा केल्या आहेत. म्हणजे 207 च्या स्ट्राइक रेटने खेळणाऱ्या अय्यरने आपली सरासरी 149 धावांची राखली आहे. अय्यर आणि वढेराने आपल्या नाबाद खेळीत प्रत्येकी 4 षटकार आणि 3 चौकार ठोकले. या सहज सुंदर विजयामुळे पंजाब संघात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले. आयपीएलच्या गेल्या 11 दिवसांच्या खेळात सलग दोन विजय नोंदविणारा पंजाब हा बंगळुरू, दिल्लीनंतर तिसरा संघ ठरला आहे.