IPL 2025 – पंजाब किंग्जने केली कर्णधारपदाची घोषणा, श्रेयस अय्यरच्या नेतृ्त्वात विजेतेपदाच खातं उघडणारं?

इंडियन प्रीमियर लीग 2025 चा हंगाम 21 मार्च पासून सुरू होणार आहे. यासाठी सर्व संघ व्यवस्थापकांनी संघाची घडी सुरळीत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. याच दरम्यान पंजाब किंग्सने श्रेयस अय्यरला आगामी हंगामासाठी कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

श्रेयस अय्यरने 2024 या वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्याच बरोबर कोलकाताने श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात IPL 2024 ची ट्रॉफी उंचावली होती. तसेच रणजी आणि इराणी करंडक विजेत्या मुंबई संघाचा श्रेयसने महत्त्वपूर्ण भाग होता. त्याच्या खेळाचा चढता आलेख पाहून सय्यद मुश्ताक अली करंडकासाठी मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आली होती. श्रेयस अय्यरने सय्यद मुश्ताक अली करंडकातही आपल्या खेळाचा जलवा दाखवला आणि मुंबईच्या संघाला विजेतेपद पटकावून देण्यात खारीचा वाटा उचलला. IPL 2055 च्या लिलाव प्रक्रियेत श्रेयसला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांची बोली लावत खरेदी केले होते. पंजाब किंग्जने त्याच्यावर विश्वास दाखवत आगामी हंगामासाठी संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.

कर्णधारपदी निवड झाल्यानंतर श्रेयस अय्यरने संघ व्यवस्थापनाचे आभार मानले. “संघाने माझ्यावर विश्वास दाखवला याचा मला आदर आहे. प्रशिक्षक पाँटिंगसोबत पुन्हा काम करण्यास मी उत्सुक आहे. संघ मजबूत दिसत असून क्षमता असलेल्या आणि चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे उत्कृष्ट मिश्रण संघामध्ये आहे. आमचे पहिले विजेतेपद जिंकून व्यवस्थापनाने दाखवलेल्या विश्वासाची परतफेड करू शकू. मला आशा आहे की आम्ही ते करू.” असे श्रेयस अय्यर म्हणाला आहे.