आज मुंबईकरांमध्ये कांटे की टक्कर; अजिंक्य रहाणे विरुद्ध श्रेयस अय्यर यांच्यात लढत

मुंबईकर क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांच्यात कांटे की टक्कर होणार आहे. पंजाब आणि कोलकाता दोन्ही संघांनी तीन-तीन विजय नोंदवल्यामुळे उद्या चौथ्या विजयासाठी दोघेही एकमेकांशी भिडणार आहेत. अव्वल चार संघांत स्थान मिळविण्याचा दोघांचा प्रयत्न असल्यामुळे मुल्लानपूरच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संघर्षाची ठिणगी पडणार हे निश्चित आहे.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणारा पंजाबचा संघ यंदा जबरदस्त फॉर्मात आहे. फलंदाजीमध्ये प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, शशांक सिंग हे तुफान खेळताहेत; तर गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन,  मार्को यान्सन हेसुद्धा आग ओकताहेत. मात्र, स्टार फिरकीवीर यजुवेंद्र चहलला अद्याप सूर गवसलेला नाही.

दुसरीकडे कर्णधार अजिंक्य रहाणेचा गतविजेता कोलकाता उद्याच्या सामन्यात पंजाबविरुद्ध तगडे आव्हान उभारणार आहे. क्विंटन डिकॉक, सुनिल नरीन, अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर यांच्या बॅटीतून फटकेबाजी होत असल्यामुळे पंजाबच्या गोलंदाजीपुढे कोलकाताच्या फलंदाजांचे तगडे आव्हान असेल, तर वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा मोइन अली या कोलकाताच्या गोलंदाजांपुढे पंजाबच्या फलंदाजीचा कस लागणार आहे.