
आपल्या घरच्याच मैदानावर खेळत असलेल्या गुजरात टायटन्सची पावले वेगाने विजयाच्या दिशेने पडत असताना पंजाब किंग्जच्या गोलंदाजांनी त्यावर यशस्वी नियंत्रण मिळवले. 244 धावांचा जीवघेणा पाठलाग करत असलेल्या गुजरातला 232 धावांवर रोखत पंजाबने आपली विजयी मोहीम फत्ते केली. गुजरातला आपल्या घरच्याच मैदानावर आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले.
श्रेयस अय्यरच्या 42 चेंडूंतील 97 धावा आणि शशांक सिंहने 16 चेंडूंत ठोकलेल्या 44 धावांनी पंजाबला 5 बाद 243 अशी जबरदस्त मजल मारून दिली होती. गुजरातनेही 244 धावांचा वायूवेगाने पाठलाग करत सामन्याचा थरार शेवटच्या षटकापर्यंत कायम राखला.
शुभमन गिल (33) आणि साई सुदर्शन (74) यांनी 61 धावांची सलामी दिली. त्यानंतर साई आणि जोस बटलरने 84 धावांची फटकेबाजी करत सामना गुजरातच्या बाजूने वळवला होता. 14 षटकांत 169 धावांपर्यंत झेप घेणाऱया गुजरातला विजय वैशाक आणि मार्को यान्सनने पुढील तीन षटकांत केवळ 18 धावाच दिल्या आणि येथेच गुजरात मागे पडली.
शेवटच्या 3 षटकांत 57 धावांची गरज असताना गुजरातच्या फलंदाजांना 45 धावाच वसूल करता आल्या आणि पंजाबने गुजरातला 232 धावांवरच रोखले. इम्पॅक्ट प्लेअर शेरफेन रुदरफोर्डने गुजरातच्या विजयासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, पण त्याचे दोन षटकार कमीच पडले.
श्रेयसचे शतक हुकले
पंजाबच्या डावात श्रेयस अय्यरचा झंझावात मनोरंजक ठरला. त्याने प्रियांश आर्यसह 51 धावांची सलामी दिली. यात प्रियांशने 23 चेंडूंत 47 धावा ठोकल्या. त्यानंतर श्रेयसने एकहाती फटकेबाजी केली. त्याने मार्कोस स्टॉयनीसबरोबर 57 धावांची भागी रचत 15व्या षटकात संघाला दीडशेपार नेले. 16व्या षटकात स्टॉयनीस बाद झाल्यानंतर शशांक सिंग आणि श्रेयसने गुजरातच्या गोलंदाजीच्या अक्षरशः चिंधडय़ा उडवत 28 चेंडूंत 81 धावा कुटल्या. श्रेयसने 9 षटकारांचा वर्षाव करत शतकाच्या दिशेने झेप घेतली होती. शेवटच्या षटकात त्याला केवळ एका चौकाराची गरज होती. पण शशांकने सहा चेंडूंवर पाच चौकार खेचत श्रेयसला एकही चेंडू खेळू दिला नाही आणि श्रेयस 97 धावांवरच नाबाद राहिला. शेवटच्या षटकात 23 धावा काढल्यामुळेच पंजाबची मजल 243पर्यंत पोहचू शकली. शशांकने 16 चेंडूंत 6 चौकार आणि 2 षटकारांसह 44 धावा चोपल्या. गुजरातच्या साई किशोरने 30 धावांत 3 विकेट टिपल्या.