राणाची चेन्नईच्या राजावर मात, सलग दोन पराभवांनंतर राजस्थानचा विजय

एकेकाळी क्रिकेटविश्वात फिनिशर म्हणून लौकिक असलेल्या महेंद्रसिंग धोनीला आपला खेळ दाखवण्याची संधी लाभली होती, पण तो अपयशी ठरला. शेवटच्या षटकात चेन्नई विजयापासून 20 धावा दूर होता आणि धोनीच्या हातात बॅट होती, मात्र तो बाद झाला आणि चेन्नईला केवळ 13 धावाच काढता आल्या. सलग दोन पराभवांमुळे तळाला असलेल्या राजस्थानला आज नितीश राणाच्या झंझावाती खेळीमुळे चेन्नईच्या राजावर मात करता आली.

नितीश राणाच्या 36 चेंडूंतील 5 षटकार आणि 10 चौकारांच्या जोरावर ठोकलेल्या 81 धावांच्या खेळीमुळे राजस्थानला 182 धावांपर्यंत मजल मारता आली होती. यशस्वी जैसवाल (4) सलग तिसऱया सामन्यातही अपयशी ठरला, मात्र संजू सॅमसनसह (20)नितीश राणाने 77 धावांची खणखणीत भागी रचली. कर्णधार रियान परागच्या साथीनेही त्याने 38 धावांची भर घातली. राणा 12 व्या षटकात बाद झाला. त्यानंतर राजस्थानच्या डावाला फक्त रियानच धावा देऊ शकला. शेवटच्या आठ षटकांत राजस्थानला केवळ 53 धावाच करता आल्या. अन्य फलंदाजांच्या अपयशामुळे राजस्थान 9 बाद 182 धावाच करू शकला.

ऋतुराजचे जोरदार प्रयत्न

गेल्या दोन्ही सामन्यांत दमदार खेळ करणाऱया रचीन रवींद्रला एकही धाव करता आली नाही. मात्र आज कर्णधार ऋतुराज गायकवाडने 63 धावा ठोकताना संघाच्या डावाला सावरण्याचा प्रयत्न केला. त्याने आपल्या आघाडीच्या फलंदाजांबरोबर छोटय़ा-छोटय़ा भागी करत संघाला सव्वाशे पलीकडे नेले. विजयापासून 54 धावा दूर असताना गायकवाड बाद झाला. मग रवींद्र जाडेजा आणि धोनी यांना 4 षटकांत 54 धावा ठोकायच्या होत्या, पण ते अपयशी ठरले. जाडेजा 32 धावांवर नाबाद राहिला.