वानखेडेवर आज फलंदाजांचे राडे, यजमान मुंबई आणि हैदराबादमध्ये रंगणार द्वंद्व

पराभवांच्या गर्तेत अडकलेले मुंबई आणि हैदराबाद हे स्टार खेळाडूंचा भरणा असलेले संघ वानखेडेवर फटकेबाजीची माळ लावण्यासाठी उत्सुक आहेत. आयपीएलच्या गेल्या तीन आठवडय़ांच्या खेळात दोन्ही संघ आपल्या लौकिकास साजेसा खेळ करू शकले नव्हते. मात्र गेल्या सामन्यात दोघांनी आपल्या खेळाची झलक दाखवल्यामुळे वानखेडेवर क्रिकेटप्रेमींचे धडाकेबाज मनोरंजन होण्याची दाट शक्यता आहे. कोणता संघ सामना जिंकेल, याचा अंदाज कुणीही बांधू शकत नसला तरी वानखेडेवर नयनरम्य फटकेबाजी पाहायला मिळेल, अशी क्रिकेटप्रेमींचा आशा आहे.

दोन्ही संघ समान ताकदीचे

मुंबई आणि हैदराबाद या दोघांत एक साम्य आहे. दोन्ही संघ सम ताकदीचे आहेत. दोन्ही संघांत स्टार खेळाडू आहेत, पण त्याचे स्टार अजूनही लुकलुकतच आहेत. त्यांची चमक अजून मैदानात पडलेली नाही. दिल्लीविरुद्ध मुंबईला शेवटच्या क्षणी विजय मिळवता आला होता. मुंबईच्या एकाही फलंदाजात अद्याप सातत्य दिसलेले नाही. सूर्यकुमार यादवने दोन अंकी मजल मारली असली तरी त्याला एकच अर्धशतक ठोकता आले आहे. तिलक वर्मासुद्धा मोठय़ा फटक्यांसाठी झगडत होता. मात्र चार अपयशानंतर गेल्या दोन डावांत 59, 56 धावा करून त्याने आपण कमबॅक केल्याचे दाखवलेय. हिच अपेक्षा रायन रिकल्टन, हार्दिक पंडय़ा, विल जॅक्सकडून अपेक्षा आहे. नमन धीर नेहमीच संधीचे सोने करतोय. उद्याही तो संधी मिळताच षटकारबाजी करेल.

हैदराबादच्या फटकेवीरांकडे नजरा

आयपीएलमधील सर्वात तगडा संघ म्हणून हैदराबादचे नाव पुढे आहे. मात्र या स्पर्धेत त्यांना तो खेळ दाखवण्यात पुरते अपयश आलेय. गेल्या सामन्यात पंजाबच्या 246 धावांचा पाठलाग करताना खेळ पाहून क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले होते. वानखेडेवरही ट्रव्हिस हेड, अभिषेक शर्मा, हेन्रिक क्लासन, इशान किशनच्या घणाघाताची क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. विशेष करून वानखेडेवर विजयाचा अभिषेक करण्यासाठी शर्मा सज्ज झालाय. अडीच महिन्यांपूर्वीच इंग्लंडविरुद्ध अभिषेकने 54 चेंडूंत केलेली 135 धावांची खेळी कुणीही विसरलेले नाहीत. त्यातच परवा त्याने 10 षटकारानिशी 141 धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे अभिषेकच नव्हे तर साऱयाच फटकेवीरांकडे मुंबईकरांच्या नजरा खिळल्या आहेत.

आता तरी रोहित खेळशील का…

रोहित शर्मा हिंदुस्थानी संघाचा कर्णधार आहे. पण मुंबईचे नेतृत्व त्याच्याकडे नाही. गेले वर्षभर या हिटमॅनची बॅट सणावाराप्रमाणे तळपतेय. त्याचा हा निराशाजनक खेळ पाहून आता मुंबईकर चाहत्यांवर त्याला हेट करण्याची वेळ आलीय. तो आता तरी खेळेल आणि षटकारांचे रॉकेट पाहायला मिळतील, याच अपेक्षेने चाहते त्याला पाठिंबा देत आहेत. पण तो वारंवार अपेक्षाभंग करतोय. आयपीएलच्या गेल्या पाच सामन्यांत रोहितच्या बॅटीतून 18, 17, 13, 8 आणि 0 अशा निराशाजनक खेळ्या झाल्या आहेत. ना तो एकही मोठी खेळी करू शकलेला आहे ना तो फार वेळ मैदानात उभा राहिलाय. प्रत्येक सामन्यात तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उतरलाय, पण त्याचा कसलाही इम्पॅक्ट संघावर आतापर्यंत पडलेला नाही. जर तो आताही पडला नाहीतर त्याचे आणि मुंबईचे स्पर्धेतील स्थान डळमळीत होईल.

बुमराला भेदक होण्याची गरज

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात पाठीत उसण भरल्यामुळे जसप्रीत बुमराला पाचवी कसोटी खेळता आली नव्हती. त्यानंतर तो सलग साडेतीन महिने संघाबाहेर होता. दोन सामन्यांपूर्वी बुमराचे पुनरागमन झाले असले तरी त्याला अद्याप आपला फॉर्म मिळवता आलेला नाही. गेल्या दोन्ही सामन्यांत त्याची गोलंदाजी अतिसामान्य झालीय. तसेच तो वानखेडेवर आपली पहिलीच लढत खेळतोय. आपल्या घरच्या मैदानावर त्याला गोलंदाजीची भेदकता दाखवण्याची संधी आहे. क्रिकेटप्रेमीही त्याची वाट पाहाताहेत.