चला, खाते उघडूया; आज मुंबई-गुजरातची लढत

सलामीलाच पराभवाचा धक्का बसलेले मुंबई आणि गुजरात हे दोन्ही संघ उद्या, शनिवारी आयपीएलच्या 18व्या मोसमात आपल्या विजयाचे खाते उघडण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. गुजरातला सलामीलाच आपल्या घरच्याच मैदानात पंजाबने धक्का दिला होता. आता पुन्हा ते घरीच भिडणार असले तरी मुंबईनेही विजयाचे ध्येय समोर ठेवलेय. एका सामन्याच्या बंदीनंतर हार्दिक पंडय़ा मुंबईचे नेतृत्व सांभाळणार असून त्याच्यापुढे आपल्या पूर्वाश्रमीच्या संघाला नमवण्याचे आव्हान असेल, तर शुभमन गिलला घरच्या मैदानावरील पहिले अपयश धुऊन काढण्यासाठी दुसरा सामना जिंकावाच लागणार आहे.

मुंबईने सलग तेराव्या वर्षीही आपली सलामीच्या सामन्यात पराभवाची मालिका कायम ठेवण्यातच धन्यता मानली. मुंबईचा चेन्नईविरुद्धचा खेळ पाहून ते हरण्यासाठीच मैदानात उतरले होते असे काहींना वाटलेसुद्धा; पण गुजरातविरुद्ध मानसिकता वेगळी आहे. इथे विजयच ध्येय आहे. संथगतीने षटके टाकल्याबद्दल मुंबई संघाला दंड ठोठावला होता आणि तो दंड पंडय़ाला एका सामन्याच्या निलंबनाच्या रूपाने होते. आता पंडय़ा आपला पहिला सामना खेळणार आहे. चेपॉकवर मुंबईला दीडशतकापेक्षा मोठी मजल मारता आली नव्हती.