IPL 2025 – पहिल्याच सामन्यात हिटमॅनचा जलवा दिसणार, एक चौकार अन् होणार विक्रम!

IPL 2025 ला आजपासून कोलकाताच्या ऐतिहासिक ईडन गार्डन्सवर एका दिमाखदार सोहळ्याने सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात खेळला जाणार आहे. त्यानंतर रविवारी (23 मार्च 2025) दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स पारंपरिक प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरेल. हा सामना हिटमॅन रोहित शर्मासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

नुकत्याच पार पडलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये रोहित शर्माचा विस्फोटक खेळ चाहत्यांना पहायला मिळाला होता. रोहित शर्माचा हाच दरारा आयपीएलमध्ये पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध होणार आहे. हा सामना रोहित शर्माच्या आयपीएल कारकिर्दीतला 258 वा सामना असणार आहे. या सामन्यासोबत रोहित शर्मा आयपीएलमध्ये सर्वाधिक सामना खेळणारा दुसरा फलंदाज ठरणार आहे. या बाबतीत तो दिनेश कार्तिकला मागे टाकणार आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम महेंद्र सिंग धोनीच्या नावावर आहे. धोनीने आतापर्यंत 264 सामने खेळले आहेत. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि रोहित शर्मा यांचा नंबर लागतो. दोघेही सध्या दुसऱ्या क्रमांकावर असून 257 सामने त्यांनी खेळले आहेत. यानंतर विराट कोहली (252 सामने), रवींद्र जडेजा (240 सामने) आणि शिखर धवन (222 सामने) या खेळाडूंचा समावेश आहे.

IPL 2025 – आयपीएलची क्रिकेटगिरी आजपासून, कोलकाता-बंगळुरू यांच्यात रंगणार उद्घाटनीय लढत

या विक्रमासोबत रोहित शर्माचा आणखी एका विक्रमाला गवसणी घालण्यासाठी एका चौकाराची गरज आहे. रोहितने जर चेन्नईविरुद्ध एक चौकार ठोकला तर तो आयपीएलमध्ये 600 चौकारांचा आकडा पूर्ण करेल. तसेच असा पराक्रम करणारा तो जगातील चौथा फलंदाज ठरेल. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक चौकार ठोकण्याच विक्रम शिखर धवनच्या नावावर आहे. त्याने 768 चौकार ठोकले आहेत. त्यानंतर विराट कोहली (705 चौकार), डेविड वॉर्नर (663 चौकार) आणि रोहित शर्मा (599 चौकार) यांचा समावेश आहे.