मुंबईची हारसलामी, चेन्नईने 4 विकेट आणि 5 चेंडू राखून जिंकला सामना

गतमोसमात पराभवदशमीमुळे तळाच्या दहाव्या क्रमांकावर असलेल्या मुंबई इंडियन्सची पराभवाची मालिका आयपीएलच्या अठराव्या मोसमातही कायम राहिली. चेन्नईने मुंबईचे 156 धावांचे आव्हान रचिन रवींद्रने शेवटच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकत सहजपणे गाठत विजयी सलामी दिली. मुंबईने गेल्या 12 मोसमातील सलामीचा सामना गमावण्याची आपली परंपरा सलग 13 व्या आयपीएलमध्येही कायम राखली.

आयपीएलमधील सर्वाधिक यशस्वी अशा चेन्नई आणि मुंबई इंडियन्स या दिग्गज संघांमध्ये झालेला सामना शेवटच्या षटकापर्यंत रंगला असला तरी टी-20 चा थरार आणि फटकेबाजी या सामन्यात अपेक्षेपेक्षा कमी दिसली. मुंबईच्या 156 धावांचा पाठलाग करताना इम्पॅक्ट प्लेअर राहुल त्रिपाठीने घोर निराशा केली. तो अवघ्या 2 धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने 53 धावांच्या खेळीत 26 चेंडूंत 6 चौकार 3 षटकारांची आतषबाजी करत मुंबईच्या आव्हानातील हवाच काढून टाकली. आपला पहिलाच आयपीएल सामना खेळत असलेल्या विग्नेश पुथुरने ऋतुराजला बाद करत ही जोडी पह्डली. अवघ्या 6 षटकांत या जोडीने 67 धावांची भर घातली होती आणि यात ऋतुराजचा वाटा 53 धावांचा होता. ही जोडी फुटल्यानंतर पदार्पणवीर पुथुरने शिवम दुबे (9) आणि दीपक हुडाची (3) विकेट काढत सामन्यात जान आणली. विल जॅक्सने सॅम करनचा (4) त्रिफळा उडवत चेन्नईची 5 बाद 116 अशी अवस्था केली होती.

चेन्नईचा अर्धा संघ तंबूत परतल्यानंतर मुंबईला सामन्यावर पकड मिळवण्याची संधी होती. तेव्हा रचिन रवींद्रने रवींद्र जाडेजाच्या साथीने 36 धावांची भागी रचत चेन्नईचा विजय सोप्पा केला. जाडेजा 17 धावांवर बाद झाला, पण रचिनने विसाव्या षटकात सॅण्टनरला षटकार खेचत चेन्नईला विजयी सुरुवात करून दिली.

मुंबईच्या फलंदाजांकडून निराशा

रोहित शर्मा आयपीएलच्या सलामीच्या सामन्यातही आपला इम्पॅक्ट दाखवू शकला नाही. खलील अहमदने त्याला भोपळासुद्धा फोडू दिला नाही. या निराशाजनक प्रारंभानंतर रायन रिकल्टन (13), विल जॅक्स (11) हे झंझावातही लवकर शांत झाल्यामुळे मुंबईची 3 बाद 36 अशी घसरगुंडी उडाली. मात्र तेव्हा सूर्यकुमार यादव (29) आणि तिलक वर्माने (31) अर्धशतकी भागी रचत संघाला शतकासमीप नेले.

नूरने काढला धूर

सूर्या आणि तिलक मुंबईला सावरताहेत असे वाटत असताना फिरकीवीर नूर अहमदच्या फिरकीने आपल्या पहिल्या दोन षटकांतच मुंबईचे कंबरडे मोडले. त्याने सूर्याला चकवत यष्टिचीत केले. मग तीन चेंडूंत रॉबिन मिंझ आणि तिलक वर्माचा अडथळा दूर करत मुंबईची 3 बाद 87 वरून 6 बाद 96 अशी दुर्दशा केली. नूरने नमन धीरचीही विकेट काढत मुंबईची अवस्था आणखी बिकट केली. तळाला दीपक चहरने 2 चौकार आणि 2 षटकार खेचल्यामुळे मुंबईगा अनपेक्षितपणे 155 धावांपर्यंत पोहोचता आले. मुंबईला दीडशेसमीप रोखणाऱ्या नूप अहमदने 4 षटकांत 18 धावा देत चार विकेट काढल्या. त्याची हीच कामगिरी चेन्नईच्या विजयी सलामीचा पाया ठरली. तोच सामन्याच्या विजयाचा शिल्पकार ठरला.