मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना

मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 205 धावा केल्या. प्रत्युत्तरात संपूर्ण दिल्ली संघ फक्त 193 धावा करू शकला. आयपीएल 2025 मध्ये दिल्लीचा हा पहिला पराभव आहे. याआधी त्यांनी सलग 4 विजय मिळवले होते. दुसरीकडे जर मुंबईने हा सामना गमावला असता, तर त्यांचा प्लेऑफचा मार्ग कठीण झाला असता.

दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार अक्षर पटेल यांनी मैदानाच्या परिस्थितीचा अंदाज घेत हा निर्णय घेतला, पण मुंबईच्या फलंदाजांनी त्यांना चांगलेच झुंजवले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 20 षटकांत 5 गडी गमावून 205 धाव केल्या . तिलक वर्माने 33 चेंडूत 59 धावांची आक्रमक खेळी केली, तर रायन रिकल्टनने 41 धावा, सूर्यकुमार यादवने 40 धावा आणि नमन धीरने नाबाद 38 धावा काढत मुंबईला भक्कम धावसंख्या मिळवून दिली. दिल्लीच्या गोलंदाजांपैकी कुलदीप यादवने 4 षटकांत 23 धावांत 2 बळी घेतले, तर विप्रज निगमनेही 2 बळी घेतले.

206 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात चांगली झाली. करुण नायरने 40 चेंडूत 89 धावांची जबरदस्त खेळी केली आणि 22 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने जसप्रीत बुमराहसारख्या दिग्गज गोलंदाजाला 18 धावा काढून दमवले. पण नायर बाद झाल्यावर दिल्लीची फलंदाजी कोसळली. शेवटच्या काही षटकांत सलग तीन रन-आउट झाल्याने दिल्लीला 20 षटकांत 193 धावांपर्यंतच मजल मारता आली आणि त्यांना 12 धावांनी पराभव पत्करावा लागला.