मुंबईला वानखेडेवर विजयाचा जॅकपॉट, विल जॅक्सची अष्टपैलू कामगिरी; मुंबईचा प्रथमच सलग विजय

गुणतालिकेत तळाला असलेल्या मुंबईला आज वानखेडेवर विजयाचा जॅकपॉटला लागला. आधी 14 धावांत 2 विकेट टिपण्याची करामात आणि मग 26 चेंडूंत 2 षटकार आणि 3 चौकारांचा घणाघात करणाऱ्या विल जॅक्सने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर मुंबईला आयपीएलमध्ये सलग दुसरा विजय मिळवून दिला. या विजयानंतरही मुंबई सातव्या स्थानावरच कायम आहे, तर हैदराबादनेही आपले नववे स्थान कायम ठेवले आहे.

हैदराबादचा डाव 162 धावांवर रोखणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजांना आपल्या संघाचा विजय आधीच निश्चित केला होता. एकेका धावांसाठी झगडत असलेल्या रोहित शर्माने 3 षटकार ठोकत यंदाची आपली 26 ही सर्वोच्च खेळी केली. रोहितने 32 धावांची भागी दिल्यानंतर रिकल्टनची विकेट 31 धावांवर पडली. मग विल जॅक्सने फलंदाजीतही कमाल दाखवताना सूर्यकुमार यादवसह 52 धावांची सलामी दिली. सूर्याने 15 चेंडूंत 26 धावा चोपल्या. पॅट कमिन्सने आपल्या सलग षटकांत सूर्या आणि जॅकची विकेट काढत सामन्यात थरार आणण्याचा अपयशी प्रयत्न केला. पुढे इशान मलिंगाने सामना बरोबरीत असताना हार्दिक पंडय़ा आणि नमन धीरची विकेट काढली. त्यानंतर तिलक शर्माने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजयी फटका मारला.

आयपीएलच्या अठराव्या मोसमातील ‘सर्वात आक्रमक सलामीची जोडी’ असा लौकिक निर्माण करणाऱ्या अभिषेक शर्मा आणि ट्रव्हिस हेडने चाचपडत का होईना 59 धावांची सलामी दिली. पण ही जोडी फुटल्यानंतर त्यांच्या सर्वच फलंदाजांना एकेक धाव काढताना घाम फुटू लागला. शर्माने 40 तर हेडने 28 धावा केल्या. मग इशान किशनला या सामन्यातही आपल्या बॅटची कमाल दाखवता आली नाही. विल जॅक्सने इशानची विकेट काढली आणि पुढच्याच षटकात हेडची विकेट काढत केवळ 2 धावा दिल्या. त्याने आपल्या 3 षटकांत केवळ 14 धावा देत 2 विकेट काढल्या. इथूनच हैदराबादचा डाव संथ झाला. मग नितीश रेड्डीसुद्धा 19 धावा करून माघारी परतला. मुंबईच्या बुमरा, बोल्टसह साऱ्याच गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांना अक्षरशः वेसण घातले होते. त्यामुळे 17 षटकांत फलकावर केवळ 115 धावा लागल्या होत्या. तेव्हाच हेन्रीक क्लासनने दीपक चहरच्या सलग चार चेंडूंवर 6, 4, 4, 6 अशा वसूल केल्या. 18 व्या षटकात 21 धावा वसूल केल्यानंतर बुमराने 19 व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर क्लासनचा त्रिफळा उडवला आणि मग पुढील पाच चेंडूंत केवळ 4 धावा दिल्या. या अचूक षटकामुळे हैदराबादची धावसंख्या पुन्हा मंदावली. मात्र शेवटच्या षटकात अनिकेत वर्माने दोन षटकार तर कमिन्सने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत हार्दिक पंडय़ाच्या षटकात 22 धावा चोपून काढत हैदराबादला अनपेक्षितपणे 162 धावांपर्यंत नेले.

हैदराबादला केले हैराण

हैदराबादच्या फटकेबाजांना मुंबईच्या गोलंदाजांनी चांगलेच हैराण केले. 300 धावांचे लक्ष्य गाठण्याची क्षमता असलेल्या हैदराबादला आज 150 धावांचा टप्पाही एव्हरेस्टसारखा भासत होता. आठव्या षटकात 59 धावांवर पहिली विकेट पडल्यानंतर  हैदराबादच्या धडाकेबाजांना मुंबईच्या गोलंदाजांच्या अप्रतिम माऱ्यासमोर पुढील 57 चेंडूंवर केवळ 56 धावांत काढता आल्या होत्या. ही मंदावलेली धावगतीच हैदराबादला पराभवाच्या खड्डय़ात घेऊन जाणारी ठरली.