IPL 2025 – मुंबईच्या विजयानंतरही हार्दिक पंड्या ट्रोल, एका चुकीमुळे 23 वर्षीय खेळाडूचा विक्रम हुकला; आता पुन्हा संधी नाही

मुंबई इंडियन्स ने यंदाच्या हंगामातील पहिला विजय मिळवला. वानखेडेवर सोमवारी झालेल्या लढतीत मुंबईने कोलकाता नाईट रायडर्सचा आठ विकेट्सने पराभव केला. अवघ्या 13 व्या षटकात विजयी आव्हान गाठल्यामुळे मुंबईचा नेट रनरेटही सुधारला आहे. गुणतालिकेमध्ये मुंबई येथे सहाव्या स्थानावर झेप घेतली. अर्थात या विजयानंतरही मुंबईचा कर्णधार हार्दिक पंड्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. त्याचा एका चुकीमुळे 23 वर्षीय खेळाडूचा विक्रम हुकला असून आता आयुष्यामध्ये पुन्हा त्याला ही संधी मिळणार नाही. त्यामुळे नेटकरी हार्दिक पंड्यावर तोंडसुख घेत आहेत.

वानखेडेवर नाणेफेक जिंकून पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवत पहिल्या दोन षटकातच दोन बळी घेतले. यानंतर मुंबईच्या स्काऊट टीमने शोधलेला आणखी एक हिरा अश्वनी कुमार चमकला. आधी त्याने अजिंक्य राहणेला डीप मिडविकेटला तिलक वर्माच्या हाती झेलबाद केले. त्यानंतर रिंकू सिंह, मनीष पांडे आणि आंद्रे रसेल असा आणखी तीन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

संपूर्ण सामन्यात त्याने 3 षटकांची गोलंदाजी करत 24 धावा देत चार विकेट घेतल्या. त्याला पाच विकेट घेण्याची ही संधी होती. मात्र हार्दिक पंड्याने त्याला पुन्हा गोलंदाजीतच दिली नाही. त्यामुळे आयपीएल पदार्पणातच पाच विकेट घेणारा पहिला हिंदुस्थानी गोलंदाज होण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची संधी अश्वनी कुमार यांनी गमावली. यामुळे सोशल मीडियावर पंड्या ट्रोल होत आहे. कधी फलंदाजांचे शतक पूर्ण होऊ देत नाही, अर्धशतक पूर्ण होऊ देत नाही, तर कधी गोलंदाजांच्या पाच विकेट पूर्ण होऊन देत नाही असे म्हणत सोशल मीडिया युजर्सने पंड्यावर निशाणा साधला आहे.

कोण आहे अश्वनी कुमार?

अश्वनी कुमार हा मूळचा पंजाब राज्यातील मोहाली येथील आहे. शेर ए पंजाब टी20 मालिकेमध्ये चमकदार कामगिरी केल्यामुळे तो चर्चेत आला होता. मेगा लिलावात मुंबईने त्याला तीस लाख रुपये मोजून आपल्या ताफ्यात घेतले. तत्पूर्वी 2024 ला तो पंजाब किंग्सच्या संघातही होता मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. पंजाबच्या संघाकडून तो सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळला आहे. 2022 ला त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत चार सामने खेळले. यात त्याने 8.5 च्या इकॉनॉमिने तीन विकेट्स घेतल्या. तसेच पंजाब कडून तो प्रथम श्रेणीचे दोन आणि ‘लिस्ट ए’चे चार सामनेही खेळला आहे.