IPL 2025 – पोलिसांच्या सूचनेवरून आयपीएलच्या वेळापत्रकात बदल, KKR Vs LSG सामन्याची तारीख बदलली

आयपीएल 2025 च्या 19 व्या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात 6 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता ईडन गार्डन्सवर सामना रंगणार होता. परंतु पोलिसांनी सामन्याची तारीख बदलण्यास सांगितले होते. त्यामुळे या सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे.

कोलकाता पोलिसांनी 6 एप्रिल रोजी श्री रामनवमी असल्यामुळे बंगाल क्रिकेट असोसिएशला कोलकाताविरुद्ध लखनऊ सामन्याच्या तारखेत बदल करण्याची मागणी केली होती. त्यानंतर BCCI ने या सामन्याच्या तारखेत बदल केला आहे. ताज्या वेळापत्रकानुसार 6 एप्रिल रोजी रविवारी कोलकाता आणि लखनऊ यांच्यात लढत होणार होती. परंतु बदललेल्या तारखेनुसार हा सामना आता डबल हेडर स्वरुपात 8 एप्रिल रोजी दुपारी 3.30 वाजता खेळला जाणार आहे. याच दिवशी संध्याकाळच्या सत्रामध्ये चंदीगढमध्ये पंजाब किंग्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना खेळला जाईल. आयपीएल 2025 मध्ये एकूण 12 डबल हेडर सामने खेळले जाणार आहेत.