IPL 2025 – थला CSK च्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार! दिल्लीविरुद्ध उतरणार मैदानात?

आयपीएल आता चांगलीच रंगात आली आहे. दररोज प्रत्येक संघातील विविध खेळाडूंची चमकदार कामगिरी चाहत्यांना पाहायला मिळत आहे. अशातच CSK च्या गोटातून थला प्रेमींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. शनिवारी (5 एप्रिल 2025) होणाऱ्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यात महेंद्र सिंग धोनी कर्णधारपद सांभाळताना दिसण्याची शक्यता आहे.

राजस्थान रॉयल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर ऋतुराजला दुखापत झाली होती. त्यामुळे शनिवारी दिल्लीविरुद्ध होणाऱ्या सामन्यात तो मैदानात उतरण्याची शक्यता फार कमी आहे. अशा स्थितीत कर्णधारपदाची धुरा कोण सांभाळणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या घडीला चेन्नईमध्ये महेंद्र सिंग धोनीव्यतिरिक्त इतर कोणताच अनुभवी खेळाडू नाही, जो कर्णधारपदाची जबाबदारी पार पाडू शकेल. महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. दिल्लीविरुद्ध चेन्नईचा सामना शनिवारी (5 एप्रिल 2025) दुपारी 3.30 वाजता एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे.