
गुणतालिकेत रसातळाला असलेल्या लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सला 6 गडी आणि 3 चेंडू राखून पराभवाची धडक देत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या गुणतक्त्यात अव्वल स्थानावरून खाली खेचले. एड्न मार्करम व निकोलस पूरन यांची दणकेबाज अर्धशतके ही लखनौच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. सामनावीरची माळ मार्करमच्या गळ्यात पडली.
गुजरातकडून मिळालेले 181 धावांचे लक्ष्य लखनौने 19.3 षटकांत 4 बाद 186 धावा करून सहज पूर्ण केले. एडन मार्करम (58) व कर्णधार ऋषभ पंत (21) यांनी लखनौला 65 धावांची सलामी दिली. प्रसिध कृष्णाने पंतला सुंदरकरवी झेलबाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर सुपर फॉर्मात असलेल्या निकोलस पूरनने आणखी एक धडाकेबाज अर्धशतकी खेळी करून लखनौच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. मार्करमने 31 चेंडूंत 9 चौकार व एक षटकार लगावला, तर पूरनने 34 चेंडूंत 61 धावा फटकावताना एक चौकार आणि तब्बल 7 षटकारांचा घणाघात केला.
प्रसिध कृष्णानेच मार्करमला गिलकरवी झेलबाद करून गुजरातला दुसरे यश मिळवून दिले. राशिद खानने निकोलस पूरनला शाहरुख खानकरवी झेलबाद केले, पण तोपर्यंत विजय लखनौच्या आवाक्यात आला होता. मग आयुष बदोनीने (नाबाद 27) डेव्हिड मिलर (7) व अब्दुल समद यांच्या साथीने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. गुजरातकडून प्रसिध कृष्णाने 2, तर राशिद खान व वॉशिंग्टन सुंदर यांनी 1-1 फलंदाज बाद केला.
त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने 6 बाद 180 धावसंख्या उभारली. यात साई सुदर्शन (56) व कर्णधार शुभमन गिल (60) यांनी 12.1 षटकात 120 धावांची खणखणीत सलामी देत गुजरातला झकास सुरुवात करून दिली. मात्र, इतर फलंदाजांनी निराशा केल्याने गुजरातला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही.
जोस बटलर (16), वॉशिंग्टन सुंदर (2) व इम्पक्ट प्लेअर शेरफन रुदरफोर्ड (22) हे फलंदाज अपयशी ठरल्याने गुजरातला अपेक्षित दोनशे धावांचा पल्ला गाठता आला नाही. लखनौकडून शार्दूल ठाकूर व रवी बिश्नोई यांनी 2-2 फलंदाज बाद केले, तर दिग्वेश राठी व आवेश खान यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.