
आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 18व्या हंगामात लखनौ सुपर जायंट्सची सलामीची लढत दिल्ली कॅपिटल्स संघाशी झाली होती. दिल्लीने या लढतीत बाजी मारली होती. आता परतीच्या लढतीत घरच्या मैदानावर त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी लखनौचा संघ आतूर झालाय. उभय संघांत तोडीस तोड खेळाडू असल्याने लखनौ-दिल्ली संघांमध्ये उद्या (दि. 22)‘ ‘काँटे की टक्कर’ अपेक्षित आहे.
राजस्थान रॉयल्सला जयपूरमध्ये हरवून मनोबल उंचावलेला लखनौ सुपर जायंट्सचा संघ आता घरच्या मैदानावर विजयाची लय राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल. दुसरीकडे मागील लढतीत गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवानंतर विजयाच्या रुळावर परतण्याचे दिल्ली कॅपिटल्सपुढे आव्हान असेल. लखनौकडे निकोलस पुरन, मार्करम, मिचेल मार्श, आयुष बदोनी व अब्दुल समद अशी फलंदाजांची तगडी फौज आहे. मात्र त्यांचा गोलंदाजी ताफा म्हणावा तेवढा धारदार वाटत नाहीये. मयंक यादव कधी मैदानावर उतरतो याचीच हा संघ वाट बघतोय. दिल्लीविरुद्ध तो मैदानावर उतरल्यास नक्कीच लखनौला फायदा होणार आहे.