निकोलस पूरनच्या वादळात गुजरात उध्वस्त, लखनौचा दणदणीत विजय

लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सवर 6 गडी राखून विजय मिळवला आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गुजरातने फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 180 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने 18.5 षटकांत 4 बाद 181 धावा करत हा सामना जिंकला.

गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी चांगली सुरुवात केली. दोघांनी पहिल्या गडीसाठी 120 धावांची भागीदारी केली. गिलने 60 धावा (38 चेंडू, 6 चौकार, 2 षटकार) आणि सुदर्शनने 56 धावा (41 चेंडू, 5 चौकार, 1 षटकार) केल्या. मात्र ही जोडी बाद झाल्यानंतर गुजरातची फलंदाजी कोलमडली. रवी बिश्नोईने सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर (2 धावा) यांना एकाच षटकात बाद करत लखनौला सामन्यात परत आणले. जोस बटलर (16) आणि शेर्फेन रदरफोर्ड (22) यांना दिग्वेश राठी आणि शार्दूल ठाकूर यांनी बाद केले. शार्दूलने शेवटच्या षटकात राहुल तेवतिया (0) याला बाद करत गुजरातला 180/6 वर रोखले. बिश्नोई (2/29) आणि ठाकूर (2/34) यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

181 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौची सुरुवात कर्णधार रिषभ पंत (21 धावा, 18 चेंडू) आणि एडन मार्करम यांनी केली. पंत लवकर बाद झाला, पण मार्करम आणि निकोलस पूरन यांनी डाव सांभाळला. मार्करमने 31 चेंडूत 58 धावा (6 चौकार, 3 षटकार) करत अर्धशतक ठोकले. तर पूरनने 23 चेंडूत 50 धावा (4 चौकार, 4 षटकार) करत आक्रमक खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या गडीसाठी 50+ धावांची भागीदारी करत लखनौला विजयाच्या जवळ आणले. पूरन बाद झाल्यानंतर आयुष बदोनी (18*) आणि हिम्मत सिंग (8*) यांनी चांगली खेळी करत , लखनौला विजय मिळवून दिला.