IPL 2025 – राहुलने नाकारले दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद

चॅम्पियन्स ट्रॉफी संपली, आता इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) नगारे वाजायला लागले आहेत. सर्व आयपीएल संघांनी या लोकप्रिय टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी आपली मोर्चेबांधणी सुरूही केली आहे, मात्र दिल्ली कॅपिटल्स संघाचा अजून कर्णधारच ठरलेला नाहीये. त्यांनी लोकेश राहुलला कर्णधारपदासाठी विचारणा केली होती, मात्र त्याने नकार दिल्याने दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची माळ अक्षर पटेलच्या गळय़ात पडण्याची शक्यता बळावली आहे.

लखनौला सोडचिठ्ठी देत लोकेश राहुलने दिल्ली कॅपिटल्सची वाट धरली. दिल्लीने त्याला 14 कोटी रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात घेतले. याचबरोबर अष्टपैलू अक्षर पटेलसाठा या संघाने तब्बल 16 कोटी 50 लाख रुपये मोजले. सर्व संघांनी आपापल्या संघांचे कर्णधार ठरवले आहेत, पण दिल्ली कॅपिटल्सला अद्याप कर्णधार मिळालेला नाहीये. यष्टिरक्षक फलंदाज लोकेश राहुल की अष्टपैलू फिरकीपटू अक्षर पटेल या दोघांपैकी कोणाला कर्णधार करायचे, या फेऱ्यात हा संघ अडकलाय.