IPL 2025 – कोलकात्याचाही हैदराबादला हादरा

आयपीएलच्या गेल्या मोसमातील सर्वात धोकादायक संघ असलेल्या हैदराबादला कोलकात्याकडूनही हादरा बसला. पहिल्याच सामन्यात 286 धावांचा पाऊस पाडणाऱ्या हैदराबादच्या फलंदाजीतल्या हल्लेखोरांना कोलकात्याच्या चेंडूबहाद्दरांनी अवघ्या 120 धावांत गुंडाळले आणि 80 धावांच्या खणखणीत विजयाची नोंद केली. या विजयामुळे दहाव्या स्थानावर असलेल्या कोलकात्याने थेट पाचव्या क्रमांकावर झेप घेतली, तर पराभवाची हॅटट्रिक करणारा हैदराबाद दहाव्या स्थानावर पोहोचला आहे.

कोलकात्याच्या मधल्या फळीचा घणाघात

कोलकात्याच्या फलंदाजीचे सलामीवीर क्विंटन डिकॉक (1) आणि सुनील नरीनला (7) अवघ्या 16 धावांतच गारद करण्याची किमया कर्णधार पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमीने दाखवली. पण या संधीचा फायदा उठवण्यात हैदराबादी गोलंदाज अपयशी ठरले. त्यानंतर मधल्या फळीने हैदराबादच्या गोलंदाजांना फोडून काढले. कर्णधार अजिंक्य रहाणेने 4 षटकारांचा घणाघात दाखवताना 38 धावा चोपल्या आणि अंगक्रिष रघुवंशीबरोबर 81 धावांची भागी रचली. अंगक्रिषने या आयपीएलमधली पहिली अर्धशतकी साकारताना 50 धावा केल्या. त्यानंतर व्यंकटेश अय्यर (60)आणि रिंकू सिंहने (32) डाव सांभाळला. 15 षटकांत 4 बाद 122 अशी सामान्य धावसंख्या असलेल्या कोलकात्याला या दोघांनी दोनशेजवळ नेले. शेवटच्या 23 चेंडूंत 11 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत या दोघांनी 76 धावांची भागी रचली.

हैदराबादची झंझावाती घसरगुंडी

अंगक्रिष रघुवंशी (50) आणि व्यंकटेश अय्यर (60) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकात्याने 6 बाद 200 अशी जबरदस्त धावसंख्या उभारली होती आणि 201 धावांचा पाठलाग हैदराबादच्या धुरंधरांना झेपलाच नाही. षटकार-चौकारांचे बादशाह असलेल्या ट्रव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशान यांची प्रत्येकी 2 धावांवरच विकेट पडल्यामुळे हैदराबादची 3 बाद 9 अशी अवस्था झाली. वैभव अरोरा आणि हर्षित राणाने पहिल्या 13 चेंडूंतच या आक्रमकांची विकेट काढत हैदराबादचे 12 वाजवले. येथेच हैदराबादसाठी सामना संपला होता. वैभवने हेड-इशाननंतर क्लासनचाही विकेट काढत हैदराबादचा खेळ खल्लास केला होता. त्यानंतर हैदराबादच्या कुणीही 201 धावांचा पाठलाग न केल्यामुळे कोलकात्याचा विजय निश्चित झाला होता. फक्त 17 व्या षटकात आंद्रे रसलने हर्षल पटेलला स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपत विजयावर शिक्कामोर्तब केले.

हैदराबादची ‘हार’ट्रिक

आयपीएलच्या या मोसमात अद्याप एकाही संघाला आपल्या विजयाची हॅटट्रिक साजरी करता आलेली नाही. मात्र पराभवाची हॅटट्रिक सहन करण्याचे दुर्दैव हैदराबादच्या पदरी पडले आहे. मुंबईसुद्धा ‘हार’ट्रिकच्या उंबरठय़ावर होती, पण कोलकात्याला नमवून त्यांनी आपली ‘हार’ट्रिक टाळली, मात्र आज ते हैदराबादला करता आले नाही. हैदराबादने पहिल्याच सामन्यात 6 बाद 286 धावांचा पाऊस पाडला होता. मात्र त्यानंतर सलग तिन्ही सामन्यांत त्यांच्या धडाकेबाजांनी निराशा केल्यामुळे हैदराबाद तळाला पोहोचला आहे. पहिल्या विजयानंतर दुसऱ्या सामन्यात हैदराबादचा लखनौने धुव्वा उडवला होता. त्यानंतर दिल्लीनेही त्यांच्या 164 या आव्हानाची 16 व्या षटकांतच धूळधाण उडवली.