
कोलकाता नाइट रायडर्सला आपल्या घरच्याच मैदानात उद्घाटनीय लढतीत पराभवाचा धक्का बसला होता, तर राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादकडून मात खावी लागली होती. त्यामुळे सलामीलाच पराभवाची झळ सोसणारे दोन्ही संघ गुवाहाटीच्या मैदानात विजयाचे खाते उघडण्यासाठी सज्ज झाले आहेत.
गतविजेत्या कोलकात्याला अजिंक्य रहाणेच्या रूपाने नवा कर्णधार लाभलाय, तर संजू सॅमसनऐवजी रियान पराग राजस्थानचे नेतृत्व करणार आहे. दोघांनीही पहिल्या पराभवापासून धडा घेतलाय आणि दुसऱया सामन्यात त्याची भरपाई करण्याचे ध्येय समोर ठेवलेय. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि कोलकाताच्या फलंदाजांनी घोर निराशा केल्यामुळे त्यांना फार मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. दुसरीकडे हैदराबादच्या 287 धावांचा पाठलाग राजस्थानला झेपला नाही. म्हणजेच उभय संघाच्या फलंदाजांची आक्रमकता कमी पडली.
कोलकात्याच्या सुनील नारायणचा अपवाद वगळता एकालाही आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवता आली नाही. वरुण चक्रवर्थीचा चमत्कारिक मारा काहीही विशेष करू शकला नव्हता. मात्र गुवाहाटीत उभय संघ आपल्या सलामीच्या चुका टाळून मैदानात उतरणार आहेत.
सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणेची बॅट बंगळुरूविरुद्ध तळपली होती, पण रिंकू सिंह, आंद्रे रसल, वेंकटेश अय्यर यांना आपला झंझावात दाखवता आला नव्हता. क्विंटन डिकॉकच्या मनसोक्त फटकेबाजीचीसुद्धा क्रिकेटप्रेमी आनंदाने वाट पाहत आहेत. राजस्थानला आपल्या कामगिरीत सुधारणा करायची असेल तर गोलंदाजीत चांगला मारा करावा लागेल. त्यांचा महत्त्वाचा गोलंदाज जोफ्रा आर्चरला 4 षटकांत 76 धावा फोडून काढल्या होत्या. फारूकी आणि तीक्षणाही आपल्या गोलंदाजीची करामत दाखवू शकले नव्हते. सर्वांना गुवाहाटीत पुनरागमन करण्याची संधी लाभली आहे. या संधीचे सोने अजिंक्य रहाणे करतो, की कार्यवाहक कर्णधार रियान पराग, हे उद्याच कळू शकेल.
संभाव्य 12 सदस्यीय संघ
राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन, यशस्वी जैसवाल, रियान पराग (कर्णधार), नितीश राणा, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, महीश तीक्षणा/वनींदु हसरंगा, संदीप शर्मा, फझलहक फारुकी, तुषार देशपांडे/आकाश मधवाल.
कोलकाता – क्विंटन डिकॉक, सुनील नारायण, अजिंक्य रहाणे (कर्णधार), वेंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसल, रमणदीप सिंह, हर्षित राणा, स्पेन्सर जॉन्सन/ एनरिक नॉर्क्या, वरुण चक्रवर्थी, वैभव अरोरा.