
क्विंटन डिकॉकच्या वादळी खेळीमुळे कोलकाताने आपल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा 8 विकेटने पराभव केला. राजस्थानने दिलेले 152 धावांचे आव्हान कोलकाताने 15 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले आणि आयपीएलमधील पहिला विजय साजरा केला. सलामीला आलेला डिकॉक राजस्थानच्या गोलंदाजांवर अक्षरश: तुटून पडला होता. त्याने 61 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि खणखणीत 6 षटकारांच्या जोरावर 97 धावा चोपून काढल्या. तीन धावांनी त्याचे शतक हुकले असले तरी संघाला पहिला विजय मिळवून देण्यात त्याने महत्त्वाचा वाटा उचलला. दुसरीकडे राजस्थानचा सलग दुसऱ्या सामन्यात पराभवाला झाला आहे.
कोलकाताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधाराचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यामुळे राजस्थानला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. संघासाठी सर्वाधिक धावा ध्रुव जुरेलने केल्या. त्याने 28 चेंडूंमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 33 धावा केल्या. परंतु इतर फलंदाजांना लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. त्यामुळे राजस्थानचा संघ 9 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 151 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरला. कोलकाताकडून वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 2-2 विकेट घेतल्या तर स्पेन्सर जॉन्सनने 1 विकेट घेतली.