
सलग दोन पराभवांनी सुस्त झालेल्या मुंबईच्या गोलंदाजीला कोलकात्याविरुद्ध अश्वशक्ती लाभली. पदार्पणातच विकेटचा चौकार ठोकणाऱया अश्वनी कुमारच्या शक्तिशाली आणि भेदक माऱ्यामुळे मुंबईने 43 चेंडू आणि 8 विकेट राखून आयपीएलच्या अठराव्या मोसमातील आपल्या पहिल्या विजयाची नोंद केली. आजच्या विजयामुळे नवव्या स्थानावर असलेल्या मुंबईने थेट सहाव्या स्थानावर झेप घेतली.
दोन दिवसांपूर्वी विग्नेश पुथुरने मुंबईसाठी प्रभावी मारा केला होता, तर आज अश्वनी कुमारने भेदक आणि भन्नाट पदार्पण करत मुंबईला अनोखी शक्ती दिली. पंजाबसाठी केवळ चार टी-20 सामने खेळलेल्या अश्वनीने कोलकात्याच्या फलंदाजांना अवघ्या 116 धावांत गुंडाळत मुंबईचा पहिल्या विजय निश्चित केला होता. त्यानंतर 117 धावांचा पाठलाग करताना रायन रिकल्टन आणि रोहित शर्माने 46 धावांची सलामी दिली, पण यात रोहितचा अवघ्या 13 धावांचा वाटा होता. मग रिकल्टनने विल जॅक्ससह 45 धावांची भर घातली. रिकल्टनने 5 षटकारांची आतषबाजी करत आपले अर्धशतक साकारले. जॅक्सनंतर फलंदाजीला उतरलेल्या सूर्यकुमार यादवने आपल्या मुंबईकरांना खूश करताना 9 चेंडूंत 3 चौकार आणि 2 षटकार खेचत 27 धावा चोपत मुंबईच्या विजयावर 12.5 षटकांतच शिक्कामोर्तब केले. मुंबईने 121 धावा फटकावतानाही 9 षटकारांची फटाकेबाजी केली.
मुंबईची भन्नाट सुरुवात
गेल्या दोन्ही सामन्यांत मुंबईला गोलंदाजांकडून चांगली सुरुवात लाभली नव्हती; मात्र आज ट्रेंट बोल्टने आपल्या पहिल्याच षटकात ती सुरुवात करून दिली. सामन्याच्या चौथ्याच चेंडूवर त्याने सुनील नरीनचा त्रिफळा उडवला. दुखापतीमुळे दुसऱया सामन्यात खेळू न शकलेल्या नरीनने आज पुनरागमन केले, पण तो भोपळासुद्धा फोडू शकला नाही. त्यानंतर दीपक चहरने आपल्या पहिल्याच चेंडूवर क्विंटन डिकॉकला अश्वनी कुमारच्या हाती झेल देण्यास भाग पाडले आणि कोलकात्याची 2 बाद 2 अशी केविलवाणी अवस्था केली. यानंतर कोलकात्याच्या डावाला कुणीच सावरू शकला नाही.
अश्वनीचे भेदक पदार्पण
एकीकडे कोटय़वधींचे स्टार चाचपडत असताना अवघ्या 30 लाखांत मुंबईच्या ताफ्यात आलेल्या अश्वनी कुमारच्या भेदक आणि शक्तीपूर्ण माऱ्याने गतविजेत्या कोलकात्याच्या दिग्गज फलंदाजांना अक्षरशः तुडवले. आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱया अश्वनीने आपल्या पहिल्याच चेंडूवर कोलकात्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेची विकेट काढली आणि सनसनाटी निर्माण केली. त्यानंतर अश्वनीने आपल्या दुसऱ्या षटकात रिंकू सिंह आणि मनीष पांडेला बाद करत कोलकात्याची अवस्था आणखी दारुण केली. याच अश्वनीने आंद्रे रसलची यष्टी वाकवत आपला चौथा विकेटही टिपला. त्याने 3 षटकांतच 24 धावांत 4 मोहरे टिपत टी-20मधील ऐतिहासिक कामगिरी केली. आयपीएल पदार्पणात चार विकेट टिपणारा अश्वनी पहिलाच हिंदुस्थानी गोलंदाज ठरला. अश्वनीला चौथे षटकही टाकण्याची संधी मिळाली असती तर त्याच्या विकेटचा आकडा पाच किंवा सहासुद्धा झाला असता. पण हार्दिक पंडय़ाने विग्नेश पुथूरच्या हाती चेंडू दिला आणि त्यानेही यश मिळवले. कोलकात्याला शंभरी गाठून देणाऱया रमणदीपची 22 धावांची खेळी मिचेल सॅण्टनरने संपवली. त्यामुळे कोलकाता 116 धावांपर्यंतच पोहचू शकला.