IPL 2025 – दिल्ली कॅपिटल्सला धक्का! दिग्गज फलंदाज पहिल्या सामन्याला मुकणार

दिल्ली कॅपिटल्सच्या मागे जे शुक्लकाष्ट लागले आहे ते थांबण्याचे नाव घेत नाहीए. हॅरी ब्रुकने ऐनवेळी आयपीएलमधून माघार घेतल्यामुळे धक्का बसलेल्या दिल्लीच्या संघाला आणखी एक धक्का बसला आहे. सलामीचा व अनुभवी फलंदाज के.एल राहुल या यंदाच्या सिझनच्या पहिल्याच सामन्याला मुकण्याची शक्यता आहे. राहुल हा काही खासगी कारणास्तव थोडा व्यस्त असून अद्याप तो पहिला सामना खेळेल की नाही याबाबत साशंकता असल्याचे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्सर पटेलने सांगितले आहे.

के.एल राहुल याची पत्नी अभिनेत्री आथिया शेट्टी ही गरोदर असून तिचा सध्या नववा महिना सुरू आहे. त्यामुळे तिची कोणत्याही क्षणी डिलिव्हरी होऊ शकते. या कारणास्तव राहुल हा कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. त्यामुळे राहुल कदाचित पहिले एक दोन सामने खेळू शकणार नसल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी दिल्ली कॅपिटल्सचा यंदाच्या सिझनचा पहिला सामना होणार आहे. विशाखापट्टनमच्या डॉ. वाय एस राजशेखऱ रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स व लखनौ सुपरय जायंट्स एकमेकांना भिडणार आहेत.

याआधी इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रुक याने आयपीएलमधून माघार घेत दिल्ली कॅपिटल्सला धक्का दिला. दिल्लीने ब्रुकला तब्बल साडे सहा कोटींना विकत घेतले. मात्र सिझन सुरू व्हायला अवघे काही दिवस बाकी असताना ब्रुकने आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर बीसीसीआयने ब्रुकवर दोन वर्षांची बंदी घातली आहे.