
टीम इंडियाचं ब्रम्हास्त्र आणि मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून संघातून बाहेर आहे. बॉर्डर गावस्कर करंडकातील सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात तो मैदानात उतरला नव्हता. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा तो खेळला नाही. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीची धार आयपीएलमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. परंतु त्यांना अजून प्रतिक्षा करावी लागणार आहे.
ESPNcricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, वैद्यकीय पथकाकडून मंजुरी मिळाल्यानंतर एप्रिलच्या सुरुवातीला जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्स संघात सामील होण्याची अपेक्षा आहे. परंतु बुमराह किती सामन्यांना मुकणार आणि कधी संघात सामील होणार याची निश्चित तारिख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची जादू पाहण्यासाठी चाहत्यांना आणखी काही दिवस प्रतिक्षा करावी लागणार आहे.
आयपीएलला 22 मार्च पासून सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आपला पहिला सामना 23 मार्च रोजी चेन्नई विरुद्ध खेळणार आहे. त्यानंतर 29 मार्च रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबईचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. तसेच वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 31 मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (KKR) होणार आहे. या तिन्ही सामन्यांना जसप्रीत बुमराह मुकण्याची शक्यता आहे.