
इंडियन प्रीमियर लीगच्या अठराव्या हंगामात पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत सुमार राहिली आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईला पहिल्या चार पैकी तीन सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे मुंबईचा संघ गुणतालिकेमध्ये आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. मात्र आता मुंबई इंडियन्ससाठी दिलासादायक बातमी आली असून वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तंदुरुस्त झाला आहे. स्पर्धेतील उर्वरित सामन्यांसाठी बुमराह मुंबईच्या संघात दाखल झाला आहे. मुंबई इंडियन्सने एक व्हिडीओ पोस्ट करून ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
मुंबई इंडियन्सने ‘रेडी टू रोअर’ कॅप्शनसह एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात बुमराह कमबॅक करणार असल्याचे संकेत दिले आहेत. जसप्रीत बुमराने बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या सीओईकडून फिटनेस क्लिअरन्स मिळवल्याची पुष्टी मुंबई इंडियन्सने केली आहे. अर्थात बुमराह मुंबई इंडियन्ससोबत जोडला गेला असला तरी सोमवारी वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होणाऱ्या लढतीत तो मैदानावर उतरणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL pic.twitter.com/oXSPWg8MVa
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
जसप्रीत बुमराह याला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान दुखापत झाली होती. त्याच्या पाठीला सूज झाली होती आणि यामुळे तो बॉक्सिंग डे कसोटीच्या अखेरच्या दिवशी मैदानात उतरला नव्हता. याच दुखापतीमुळे इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर झालेली मालिका आणि फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीही त्याला खेळता आली नाही. तसेच आयपीएलच्या पहिल्या चार सामन्यांनाही तो मुकला.
गोलंदाजीची धार वाढणार
जसप्रीत बुमराह 2013 पासून मुंबई इंडियन्सच्या वेगवान गोलंदाजीचा कणा राहिला आहे. त्याने मुंबईसाठी खेळलेल्या 133 लढतीत 165 विकेट्स घेतल्या आहेत. आता तो संघात परतल्याने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची धार वाढणार आहे. जसप्रीत बुमराह, ट्रेन्ट बोल्ट, दीपक जहर, अश्वनी कुमार अशी वेगवान गोलंदाजांची चौकडी मुंबईकडे आहे. त्यामुळे आगामी लढतीत मुंबईचा संघ पुन्हा विजयी ट्रॅकवर येईल आणि घोडदौड सुरू करेल अशी आशा चाहत्यांना आहे.