
मुंबई विरुद्ध हैदराबाद सामन्यात इशान किशन विचित्र पद्धतीने बाद होण्याचा प्रकार अनेकांना खटकलाय. हिंदुस्थानचा माजी स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागने तीव्र शब्दांत आपली नाराजी व्यक्त करताना इशानने थोडा संयम बाळगायला हवा होता. त्याला मैदान सोडावे लागले नसते, असे परखड मत व्यक्त केले. डीआरएसचा पर्याय उपलब्ध असतानाही इशानचे डीआरएस न घेता मैदान सोडणे सर्वांना खटपू लागलेय. त्याने मैदानावरील पंचांवर निर्णय सोडायला हवा होता. कारण त्यांनाही त्यांच्या कामाचे पैसे दिले जातात, असेही सेहवाग म्हणाला.
मुंबई इंडियन्सविरुद्धच्या 41 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज इशान किशनला बाद देण्याच्या निर्णयावरून वाद पेटला आहे. फलंदाजी करताना इशान पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता मैदानाबाहेर गेला. मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक चहरने इशान किशनला लेग साईडवर एक चेंडू टाकला, जो बॅटच्या अगदी जवळून गेला. मात्र, मुंबईच्या खेळाडूंनी झेलबाद झाल्याबद्दल अपीलही केले नव्हते. मात्र, पंचांनी अर्धा हात वर केला. त्यानंतर चहरने अपील केल्यानंतर पंचांनी इशानला बाद घोषित केले. त्यानंतर इशानने आपला प्रामाणिकपणा दाखवत केलेला मूर्खपणा न पटणारा आहे. जर चेंडू बॅटला लागला असता तर ते समजण्यासारखे होते, कारण असे करणे खेळाच्या भावनेनुसार झाले असते. पण चेंडू लागला नसतानाही आणि पंचांना खात्री नसतानाही मैदान सोडून जाणे योग्य नव्हते, असे सेहवाग म्हणाला.