जोफ्रा आर्चरची तुलना लंडनच्या काळ्या टॅक्सीशी केली; क्रीडाप्रेमींचा संताप, कॉमेंट्री पॅनलमधून हरभजनला हाकलण्याची मागणी

जगातील सर्वात मोठी लीग म्हणून ओळखल्या इंडियन प्रीमियर लीगमधील एका सामन्या दरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे टीम इंडियाचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग अडचणीत आला आहे. रविवारी सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघामध्ये झालेल्या लढती दरम्यान हरभजनने वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यावर वर्णद्वेषी टिप्पणी केली. यामुळे क्रीडाप्रेमी चांगलेच संतापले असून हरभजन सिंग याची कॉमेंट्री पॅनलमधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला. हैदराबादच्या प्रत्येक फलंदाजांनी राजस्थानच्या सर्वच गोलांदाजांची धुलाई केली. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्यावरही हैदराबादचे फलंदाज तुटून पडले. त्याच्या 4 षटकांमध्ये हैदराबादने तब्बल 76 धावा लुटल्या. आयपीएल इतिहासातील तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.

याच लढतीत 18 वे षटक जोफ्रा आर्चर टाकत होता. समोर विस्फोटक खेळी करणारा ईशान किशन आणि हेनरिक क्लासेन फलंदाजी करत होते. आर्चरच्या पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर क्लासेसने लागोपाठ चौकार ठोकले. यावेळी समालोचन करणाऱ्या हरभजन सिंग याने वादग्रस्त टिप्पणी केली. ‘लंडनमध्ये काळ्या टॅक्सीचे मीटर खूप फास्ट पळते, इकडे आर्जर साहेबांचे मीटरही तसेच फास्ट पळत आहे’, असे हरभजन म्हणाला. त्याच्या या विधानामुळे सोशल मीडियावर वादळ उठले असून हरभजनची कॉमेंट्री पॅनल मधून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.

दरम्यान, या लढतीत सनरायझर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांमध्ये 286 धावा चोपल्या. हैदराबादकडून ईशान किशनने नाबाद शतक झळकावले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सला 242 धावांमध्ये रोखत हैदराबादने 44 धावांनी विजय मिळवला.