
मोहम्मद सिराजच्या भन्नाट आणि सुसाट माऱ्याने हैदराबादच्या फलंदाजांनाही गंडवले आणि गुजरातला सलग तिसरा विजय मिळवून दिला. हैदराबादचे 153 धावांचे आव्हान गुजरातने शुभमन गिल आणि वॉशिंग्टन सुंदरच्या 90 धावांच्या भागीच्या जोरावर 17 व्या षटकात 3 फलंदाज गमावतच गाठले आणि आयपीएलच्या या मोसमात विजयाची हॅटट्रिक साजरी करणारा दिल्लीनंतर पहिलाच संघ ठरला. तसेच फलंदाजांच्या दारुण अपयशामुळे हैदराबादला पराभवाच्या चौकाराची नामुष्की सहन करावी लागली.
पुन्हा एकदा सिराजचेच राज्य
गेल्या सामन्यात बंगळुरूचा धुव्वा उडवणाऱ्या मोहम्मद सिराजने आज हैदराबादच्या धडाकेबाज फलंदाजांना धडकी भरवली. त्याने अभिषेक शर्मा (18), ट्रव्हिस हेड (8), अनिकेत वर्मा (18) आणि सिमरजीत सिंह (0) या चौघांची विकेट काढताना केवळ 17 धावा दिल्या. ट्रव्हिस हेडची डोकेदुखी पहिल्याच षटकात संपवल्यावर अभिषेकलाही फार काळ टिकू दिले नाही. या यशानंतर हैदराबादच्या धावांच्या गाडीने वेग धरलाच नाही. नितीश रेड्डी (31) आणि हेन्रिक क्लासन (27) या दोघांमुळे संघाने शंभरी गाठली, तर कॅट कमिन्सच्या नाबाद 22 धावांनी हैदराबादला कसेबसे 152 पर्यंत नेले.
गिलच्या बॅटीतून पहिले अर्धशतक
गेल्या तीन सामन्यांत 49, 63 आणि 74 धावांची जोरदार खेळी करणारा साई सुदर्शन आणि सुपर फॉर्मात असलेला जोस बटलर (गेल्या तीन डावांत ना. 73, 39, 54) या दोन्ही सलामीवीरांची 16 धावांत विकेट काढल्यामुळे हैदराबाद चांगल्या स्थितीत होता; पण या बिकट स्थितीत शुभमन गिलच्या बॅटला फटके दिसले आणि त्याने स्पर्धेतील पहिली अर्धशतकी खेळी करताना चौकारपूर्ण नाबाद 61 धावा करत संघाला 20 चेंडू आधी विजय मिळवून दिला. गिलने वॉशिंग्टन सुंदरच्या साथीने 90 धावांची भागी करत संघाचा विजय निश्चित केला. मग सुंदरने 29 चेंडूंत 49 धावा ठोकताना शेरफन रुदरफोर्डसह (35) चौथ्या विकेटसाठी 47 धावांची भागी रचली. सलामीलाच पंजाब किंग्जविरुद्ध पराभूत झालेल्या गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि आता हैदराबाद सनरायझर्स या संघांना धक्का देत विजयाची हॅटट्रिक साजरी केली.