IPL 2025 – राजस्थानला 58 धावांनी धुळ चारत गुजरातने मारला विजयी चौकार, पहिला क्रमांक पटकावला

घरच्या मैदानावर गुजरातने आपलं वर्चस्व प्रस्थापित करत राजस्थानचा 58 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना 217 धावा चोपून काढल्यानंतर आव्हानाच पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या राजस्थानच्या पायात गुजरातने चांगल्याच बेड्या घातल्या. संजू सॅमसन (41 धावा), रियान पराग (26 धावा) आणि हेटमायर (52 धावा) या तिघांव्यतिरिक्त एकाही फलंदाजाला दुहेरी आकड्यापर्यंत मजल मारता आली नाही. एकापाठोपाठ एक विकेट पडत गेल्या आणि संपूर्ण संघ 159 धावांवर बाद झाला. प्रसिद्ध कृष्णाने धारधार गोलंदाजी करत सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. या विजयासह गुजरातने हंगामातील सलग चौथा विजय साजरा केला. त्याचबरोबर 8 गुणांसह गुणतालिकेत पहिला क्रमांक पटकावला आहे.