
गुजरात टायटन्सचा विजयी झंझावात राजस्थान रॉयल्सही रोखू शकला नाही. साई सुदर्शनच्या 82 धावांच्या खेळीच्या रुपाने गुजरातच्या द्विशतकी डावाला साई पावला आणि त्याने राजस्थानचा 159 धावांत खेळ खल्लास करत 58 धावांच्या दिमाखदार विजयासह आयपीएलच्या 18 व्या मोसमात विजयी चौकार अर्थातच सलग चौथा विजय नोंदविण्याचा पराक्रम सर्वप्रथम केला.
साई सुदर्शनच्या 53 चेंडूंतील 82 धावांच्या फटकेबाजीमुळे गुजरातने 6 बाद 217 अशी मोठी धावसंख्या उभारली आणि राजस्थानसमोर 218 धावांचे अवघड आव्हान उभारले. या धावांचा पाठलाग करताना राजस्थानची प्रारंभापासूनच दमछाक झाली. यशस्वी जैसवाल (6) आणि नितीश राणा (1) यांच्या निराशाजनक खेळाने राजस्थान पाठलागाच्या शर्यतीत मागे पडला. कर्णधार संजू सॅमसन (41) आणि रियान पराग (26) यांनी 48 धावांची भागी रचत राजस्थानच्या जिवात जीव आणला. मात्र ही जोडी फुटताच ध्रुव जुरेलही (5) स्वस्तात बाद झाला. मधल्या फळीत शिमरॉन हेटमायरने 3 षटकार आणि 4 चौकार खेचत 52 धावा ठोकत राजस्थानच्या विजयासाठी प्रयत्न केले, पण तोपर्यंत ते विजयापासून खूप दूर गेले होते. अखेर गुजरातच्या प्रसिध पृष्णा, राशीद खान आणि साई किशोरने 20 व्या षटकांत 159 धावांवर राजस्थानला गुंडाळत आपल्या विजयी चौकाराची औपचारिकता पूर्ण केली. आयपीएलमध्ये सलग चार विजय नोंदविणारा गुजरात पहिलाच संघ ठरला आहे. मात्र चेन्नई ला सलग चार सामने गमावण्याची झळ सोसावी लागली आहे. हा दुर्दैवी विक्रम सध्यातरी त्यांच्याच नावावर आहे.
त्याआधी सुदर्शनने जोस बटलरसह 80 आणि शाहरुख खानसह 58 धावांची भागी रचत गुजरातला 15 व्या षटकांतच दीडशेचा टप्पा गाठून दिला होता. बटलर आणि शाहरुखने प्रत्येकी 36 धावा ठोकल्या. शेवटी राहुल तेवथिया(24)आणि राशीद खानने (12) जोरदार फटके मारत संघाला 217 पर्यंत पोहोचवले.