प्ले ऑफच्या गुजरात दिशेने

गुजरातने कोलकात्याचा 39 धावांनी सहज पराभव करत आपल्या आठ सामन्यांत सहाव्या विजयाची नोंद करत आयपीएलच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान कायम राखले. एवढ़ेच नव्हे तर, स्पर्धेत फलंदाज आणि गोलंदाजांचे अव्वल स्थानही गुजरातच्या खेळाडूंनी पटकावल्यामुळे आज त्यांनी अनोखी हॅट्ट्रिकही साजरी केली. या विजयामुळे गुजरातने प्ले ऑफच्या दिशेने आपली धाव घेतली आहे.

गुजरातने धडाकेबाज सलामीवीर साई सुदर्शन (52) आणि कर्णधार शुभमन गिलच्या झंझावाती (90) खेळीच्या जोरावर 114 धावांची सलामी दिली. त्यानंतर गिलने जोस बटलरच्या (41) साथीने 58 धावांची भागी रचली. बटलरच्या फटकेबाजीमुळे गुजरातने कोलकात्यापुढे 199 धावांचे आव्हान ठेवले, जे कोलकात्याला पेलवलेच नाही. अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 50 धावा ठोकल्या. याव्यतिरिक्त सारेच फलंदाज लवकर बाद होत गेल्यामुळे कोलकाता 8 बाद 159 धावाच करू शकला. आज सुदर्शनने स्पर्धेतील पाचवे अर्धशतक झळकवताना ऑरेंज कॅपवर गेला महिनाभर हक्क गाजवत असलेल्या निकोलस पूरनच्या 368 धावांना मागे टाकत आपली धावसंख्या 417 पर्यंत नेली. तसेच गुजरातच्याच प्रसिध कृष्णाने कोलकात्याच्या 2 विकेट टिपत 16 विकेटसह पर्पल कॅपवर हक्क प्रस्थापित केला.