
इंडियन प्रीमियर लीग आता खऱया अर्थाने हिंदुस्थानी खेळाडूंच्या वर्चस्वाची लीग ठरतेय. फलंदाजी असो किंवा गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण, सर्वच क्षेत्रांत हिंदुस्थानी खेळाडूंनी आपला बोलबाला दाखवत आपणच भारी असल्याचे क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे.
आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात गेले दोन-तीन वर्षे सोडली तर फलंदाजीत आणि गोलंदाजीत विदेशी खेळाडूंचा वरचष्मा राहिला आहे. सुरुवातीपासून आयपीएल संघात सात देशी आणि 4 विदेशी खेळाडू असे चित्र असले तरी अव्वल दहा खेळाडूंमध्ये सहा-सात विदेशीच असायचे. खरे सांगायचे तर आयपीएलमध्ये विदेशी क्रिकेटपटूंचा बोलबाला असायचा. त्यांचीच फलंदाजी आणि गोलंदाजी क्रिकेटप्रेमींना मोहित करायची. मात्र आता हिंदुस्थानी क्रिकेटनेही कात टाकली असून मोठय़ा संख्येने छोटय़ा-छोटय़ा शहरांमधून गुणवान खेळाडूंची मोठी फौज आयपीएलच्या रणांगणात उतरत असल्याचे दिसतेय.
गेल आणि ऑस्ट्रेलियन्सची ताकद
आयपीएलचे अनेक हंगाम खऱया अर्थाने गाजवलेत ते वेस्ट इंडीजच्या ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेलने. गेल आपल्या झंझावाती खेळाच्या जोरावर 2011 आणि 2012 च्या मोसमात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. तशीच कामगिरी गोलंदाजीत ड्वेन ब्राव्होने 2013 आणि 2014 च्या हंगामात करून दाखवली होती. फलंदाजीत अनेक मोसम ऑस्ट्रेलियन्सच्या धडाकेबाज खेळाडूंनी आपल्या बॅटची ताकद दाखवत आयपीएल गाजवले आहे आणि गाजवत आहेत. यात प्रामुख्याने शॉन मार्श, मॅथ्यू हेडन, ख्रिस गेल, माईक हसी, डेव्हिड वॉर्नर, ट्रव्हिस हेड यांचे नाव प्रामुख्याने घेऊ शकता.
अठराव्या मोसमात हिंदुस्थानींचीच दादागिरी
आयपीएलने आपला अर्धा टप्पा गाठला आहे. गेले 25 दिवस निकोलस पूरन आणि नूर अहमद यांनी कॅप आपल्या डोक्यावर ठेवली होती. मात्र आता या यादीत साई सुदर्शन आणि प्रसिध कृष्णाने आपला दबदबा निर्माण केला आहे. एवढेच नव्हे तर अव्वल 20 फलंदाजांमध्ये चक्क 15 हिंदुस्थानी आहेत. अशीच स्थिती गोलंदाजीतही असून फक्त 4 विदेशी गोलंदाज आहेत.
सहलीला आल्यासारखे खेळताहेत विदेशी दिग्गज
आयपीएलमध्ये विदेशी फलंदाज मागे पडताहेत. हाताच्या बोटावर मोजता येतील इतके फलंदाज आपल्या बॅटची कमाल दाखवत असून हेन्रीक क्लासन, रायन रिकल्टन, शेरफन रुदरफोर्ड, रचिन रवींद्र, ट्रिस्टन स्टब्ज, शिमरॉन हेटमायर, क्विंटन डिकॉक, डेव्हिड मिलर, विल जॅक्स, फॅफ डय़ुप्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल हे फटकेवीर यंदा थंड पडले आहेत. एखादी खेळी वगळता यांना आयपीएलमध्ये अद्याप आपल्या लौकिकास साजेसा खेळ करता येत नसल्यामुळे ते खेळायला आलेत की सहलीला हेच कळत नाहीय. गोलंदाजांमध्ये जोफ्रा आर्चर, कॅगिसो रबाडा, राशीद खान, ट्रेंट बोल्ट, सुनील नरीन, पॅट कमिन्स, मिचेल सॅण्टनर यांची कामगिरी निराशाजनक झाल्याचे त्यांचे आकडे सांगत आहेत.
विदेशींच्याच डोक्यावर असायची पर्पल आणि ऑरेंज कॅप
आयपीएलचे गेले 17 मोसम पाहिले तर प्रामुख्याने जाणवेल की फलंदाजी आणि गोलंदाजीत अव्वल दहा खेळाडूंमध्ये विदेशी खेळाडूंचीच संख्या जास्त असायची आणि वजनही त्यांचेच असायचे. मात्र हळूहळू का होईना हिंदुस्थानी गुणवत्तेने आपला रागरंग दाखवायला सुरुवात केली आणि सारे आकडेच फिरवले आहेत. पहिले वर्ष शॉन मार्श आणि पाकिस्तानच्या सोहेल तन्वीरने आपल्या नावावर केले होते. त्यानंतर अनेक मोसमात पर्पल आणि ऑरेंज कॅप विदेशी खेळाडूंच्याच डोक्यावर असायची. 2016 साली विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमारने ही परंपरा मोडीत काढत या दोन्ही कॅप हिंदुस्थानी खेळाडूंच्या डोक्यावर सजवण्याचा पराक्रम केला.