IPL 2025 चा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरबमधील जेद्दाह येथे पार पडणार आहे. या लिलावासाठी एकूण 1,574 खेळाडूंनी आपल्या नावाची नोंदणी केली होती. मात्र, यापैकी 574 खेळाडूंची लिलाव प्रक्रियेसाठी निवड करण्यात आली आहे. याच दरम्यान आयपीएलच्या पहिल्या आणि अंतिम सामन्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 14 मार्च रोजी होणार आहे तर अंतिम सामना 25 मे रोजी खेळवला जाणार आहे. सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्याच बरोबर 2026 आणि 2027 च्या हंगामासाठी हीच तारीख असणार आहे असे, बीसीसआयने सर्व संघांना सुचित केले आहे. मेगा लिलाव प्रक्रियेमध्ये 574 खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत. मात्र, यापैकी फक्त 204 खेळाडूंनाच खरेदी केले जाईल. तसेच सर्व संघांच्या पर्समध्ये 641 कोटी रुपयांची रक्कम अद्याप शिल्लक आहे. आयपीएलच्या मेगा लिलाव प्रक्रियेसाठी निवडलेल्या 574 खेळाडूंपैकी 81 खेळाडूंची बेस प्राइस 2 कोटी रुपये आहे. तसेच 27 खेळाडूंची बेस प्राईज 1.5 कोटी रुपये इतकी आहे. याव्यतिरिक्त 30 लाखांपासून ते 1 करोड रुपये बेस प्राईज असणाऱ्या खेळाडूंची नावं सुद्धा यादीमध्ये समाविष्ट आहेत.