IPL 2025 – प्रतिस्पर्धांच्या भूमीवर बंगळुरूच शेर, यजमानांच्या मैदानात सलग चौथ्यांदा विजयी

आपल्या घरच्या मैदानावर म्हणजे चिन्नास्वामी स्टेडियमवर हरणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सलग चौथ्या सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या घरात घुसून हरवण्याचा पराक्रम केला. घरात फेल होत असलेल्या बंगळुरूने बाहेर शेर असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. या विजयामुळे बंगळुरू 8 गुणांसह तिसऱया क्रमांकावर पोहोचलाय.

गोलंदाजीला पोषक असलेल्या खेळपट्टीवर राजस्थान रॉयल्सला यशस्वी जैसवालच्या 75 धावांच्या खेळीमुळे 4 बाद 173 अशी माफक धावसंख्या उभारता आली. केवळ 5 षटकार ठोकण्यात यशस्वी ठरलेल्या राजस्थानच्या धडाकेबाजांना धावांचा अपेक्षित धमाका करता आला नाही. त्यामुळे त्यांच्या 174 धावांच्या आव्हानातील हवा फिल सॉल्टनेच काढली. त्याने 33 चेंडूंत 6 षटकार आणि 5 चौकार खेचत 65 धावा ठोकल्या आणि विराट कोहलीसह 92 धावांची सलामी दिली. सॉल्टनंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कलने आरामात 15 चेंडूआधी विजयावर शिक्कामोर्तब करत बाहेरील मैदानांवर विजयाचा चौकार ठोकला. कोहलीने 62 धावांची नाबाद खेळी करता सहा सामन्यांत तिसऱयात पन्नाशी गाठली तर पडिक्कलने नाबाद 40 धावा केल्या. या दोघांनीही दुसऱया विकेटसाठी 83 धावांची नाबाद भागी रचली.

धावा करणे झाले कठीण

राजस्थानच्या यशस्वी जैसवाल आणि संजू सॅमसनने फटकेबाजी करण्याचा खूप प्रयत्न केला, पण भुवनेश्वर कुमार, जोश हेझलवूड असो किंवा कृणाल पंडय़ा. कुणाच्याही गोलंदाजीवर या जोडीला धावा लुटता आल्या नाहीत. ज्या पॉवर प्लेमध्ये प्रत्येक संघ 200 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतात, तेथे या सलामीवीरांना केवळ 45 धावाच काढता आल्या. 19 चेंडूंत केवळ 15 धावा करणाऱया संजूने 7 पॉवर प्लेनंतर आपली विकेट गमावली. मग यशस्वीने काही क्रिकेटच्या पुस्तकातील सुरेख फटके खेळत आपले अर्धशतक साजरे केले. त्याने रियान परागसह 56 धावांची भागी केली. रियान 30 धावांवर बाद झाला तर संघाच्या धावांना वेग देण्याच्या प्रयत्नात यशस्वीची भाग्यवान खेळी 75 वर संपली. त्याने 2 षटकार आणि 10 चौकार लगावले.

प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानावर बंगळुरू नॉनस्टॉप 

बंगळुरू आपल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन सामने खेळली, पण दोन्ही सामन्यांत त्यांना पराभवाचे तोंड पाहावे लागले. आधी गुजरातने त्यांचा 8 विकेटनी सहज पराभव केला होता. त्यानंतर दिल्लीनेही त्यांचा 6 विकेटने धुव्वा उडवला होता. मात्र प्रतिस्पर्ध्यांच्या मैदानात खेळताना बंगळुरूने उद्घाटनीय लढतीत गतविजेत्या कोलकात्याचा पराभव केला. मग चेन्नईला त्यांच्या घरात हरवण्याचा भीमपराक्रम केला. हा त्यांचा चेपॉकवरचा 17 वर्षांनंतरचा पहिला विजय होता. मग त्यांनी मुंबईला वानखेडेवर पह्डले आणि आता राजस्थानला जयपूरमध्ये हरवले. आता त्यांची पुढची लढत चिन्नास्वामीवर होणार असून पंजाबविरुद्धच्या या सामन्यात ते आपल्या पराभवाची मालिका खंडित करतात की हार हॅटट्रिक झेलतात, हे 18 एप्रिललाच कळू शकेल.