
12 षटकांत 5 बाद 101 धावा करणाऱ्या दिल्लीला आशुतोष शर्माने 31 चेंडूंत ठोकलेल्या 66 धावांच्या अभेद्य घणाघाती फलंदाजीने आयपीएलच्या थरारक सामन्यात लखनौविरुद्ध 3 चेंडू आणि एक विकेट राखून विजय मिळवून दिला. तोच विजयाचा शिल्पकार ठरला.
शार्दुल ठाकूरने अफलातून सुरुवात करताना जेक फ्रेझर-मॅकगर्क (1) आणि अभिषेक पोरेल (0) यांची पहिल्या षटकात विकेट काढत दिल्लीची 2 बाद 2 अशी अवस्था केली. दुसऱ्याच षटकात मनीमारन सिद्धार्थने समीर रिझवीलाही बाद केले. त्यामुळे 3 बाद 7 अशा बिकट अवस्थेत असलेल्या दिल्लीला फॅफ ड्यू प्लेसिस (29) आणि अक्षर पटेल (22) या उपकर्णधार-कर्णधाराच्या जोडीने काहीसे सावरले; पण हे दोघेही पाठापोठ बाद झाले आणि दिल्ली 5 बाद 65 अशा स्थितीत पोहोचला. मग ट्रिस्टन स्टब्जनेही 3 षटकार खेचत संघाला शंभरी गाठून दिली.
आशुतोषचा अनपेक्षित खेळ
आशुतोष शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आला आणि त्याने पराभवाच्या दिशेने चालत असलेल्या दिल्लीची पावले वळवली. स्टब्जसह 48 धावांची भागी केल्यानंतर आशुतोषने विपराज निगमसह 55 धावांची भागी रचत सामना खेचून आणला. विपराजने 15 चेंडूंत 39 धावा ठोकल्या. त्यानंतर आशुतोषने एकहाती झुंजार खेळ करत 4 उत्तुंग षटकार खेचत दिल्लीला विजयी सलामी दिली. त्याने 5 षटकार आणि 5 चौकारांची फटकेबाजी केली.
परदेशींची षटकारबाजी
लखनौ सुपर जायंट्ससाठी आज परदेशी खेळाडूंनी तुफान षटकारबाजी केली. आज फक्त मिचेल मार्श (72), निकोलस पूरन (75) आणि डेव्हिड मिलर (ना. 27) यांनी 15 षटकार आणि 13 चौकारांची बरसात केली आणि लखनौला 8 बाद 209 अशी जबरदस्त धावसंख्या उभारून दिली. एडन मार्करम (15) आणि मिचेल मार्शने 46 धावांची सलामी दिल्यानंतर मार्शने निकोलस पूरनच्या साथीने अवघ्या 7 षटकांत 87 धावांची भागी रचली. मार्शने 6-6 चौकार, षटकार ठोकले, तर पूरननेही 6 चौकार आणि 7 षटकार खेचत दिल्लीच्या गोलंदाजीला अक्षरशः फोडून काढले. या भागीमुळे लखनौ 230-240 धावांची टप्पा गाठणार असे वाटत होते. मात्र ही जोडी फुटली आणि त्यानंतर लखनौची घसरगुंडी सुरू झाली. त्यामुळे शेवटच्या 7 षटकांत 48 धावांच काढता आल्या. स्टार्कने 3 तर कुलदीप यादवने 2 विकेट टिपत लखनौला मोठ्या धावसंख्येपासून रोखले.