IPL 2025 – हॅटट्रीक! दिल्लीच्या विजयाची अन् चेन्नईच्या पराभवाची

दिल्ली कॅपिटल्सने आपला सुपर फॉर्म कायम राखत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत विजयाची हॅ‌ट्ट्रिक साजरी केली. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज संघावर मात्र पराभवाच्या हॅट्ट्रिकची नामुष्की ओढावली. दिल्लीने चेन्नईवर 25 धावांनी सहज विजय मिळविला. नाबाद अर्धशतकी खेळी करणारा लोकेश राहुल या विजयाचा मानकरी ठरला. दिल्ली कॅपिटल्सने यंदाच्या हंगामात अद्यापि पराभवाचे तोंड पाहिले नसून, चेन्नईने चार सामन्यांत केवळ एक विजय मिळविला आहे.

आघाडीच्या फळीची निराशा

दिल्लीकडून मिळालेल्या 184 धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जचा डाव 5 बाद 158 धावसंख्येवरच मर्यादीत राहिला. लक्ष्याचा पाठलाग करताना रचिन रवींद्र (3), कर्णधार ऋतुराज गायकवाड (13) व डेवोन कॉन्वे (5) या आघाडीच्या फळीने निराशा केल्याने चेन्नईच्या फलंदाजीवर दडपण आले. मुकेश कुमारने रचिनला दुसऱ्याच षटकात स्वतःच्या गोलंदाजीवर झेलबाद करून दिल्लीला बहुमोल बळी मिळवून दिला. मग मिचेल स्टार्कने आलेल्या ऋतुराजला मॅकगर्कने झेलबाद करून चेन्नईला जबर धक्का दिला. त्यानंतर दुसरा सलामीवर डेवोन कॉन्वेदेखील विप्राज निगमच्या गोलंदाजीवर अक्षर पटेलकरवी झेलबाद झाल्याने चेन्नईची 3 बाद 41 अशी दुर्दशा झाली.

शंकर-धोनीची अपयशी झुंज

चेन्नईने शिवम दुबेला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आणले. मात्र, 15 चेंडूंत 18 धावा करून तो बाद झाला. मग रवींद्र जाडेजाही (2) लवकर बाद झाला. मधल्या फळीतील विजय शंकर (नाबाद 69) व महेंद्रसिंग धोनी (नाबाद 30) यांनी सहाव्या विकेटसाठी 57 चेंडूंत नाबाद 84 धावांची भागीदारी केली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. शंकरने 54 चेंडूंत 5 चौकार व एका षटकार ठोकला, तर धोनीने 26 चेंडूंत एक चौकार व एका षटकार लगावला. मात्र, या दोघांच्या नाबाद खेळीला विजयाचा टिळा न लागल्याने चेन्नईचे चाहते निराश झाले. दिल्लीकडून विप्राज निगमने 2, तर मिचेल स्टार्क, मुकेश कुमार व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

लोकेश राहुलचे अर्धशतक

त्याआधी, नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना दिल्ली कॅपिटल्सने 6 बाद 183 धावसंख्या उभारली, खलील अहमदने पहिल्याच षटकात जॅक फ्रेसर मॅकगर्कला भोपळाही फोडू न देता अश्विनकरवी झेलबाद करून चेन्नईला सुपर सुरुवात करून दिली. मात्र, त्यानंतर लोकेश राहुल (77) व अभिषेक पोरेल (33) यांनी 54 धावांची भागीदारी केली. रवींद्र जाडेजाने पोरेलला पथीरानाकरवी झेलबाद करून दिल्लीला दुसरा धक्का दिला. त्यानंतर कर्णधार अक्षर पटेलने 14 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह 21 धावा केल्या. नूर अहमदने त्याचा त्रिफळा उडविला. त्याच्या जागेवर आलेल्या समीर रिझवीने 15 चेंडूंत 20 धावा केल्या. खलील अहमदने त्याला जाडेजाकरवी झेलबाद करून चेन्नईला चौथे यश मिळवून दिले. लोकेश राहुलने 51 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकार ठोकले. तो अखेरच्या षटकात बाद झाला, इम्पॅक्ट प्लेअर मथिशा पथिराने राहुलला यष्टीमागे धोनीकरवी झेलबाद केले. त्याच्या जागेवर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आलेल्या आशुतोष शर्माला इम्पॅक्ट दाखवता आला नाही. त्याला एका धावेवर जाडेजाने धोनीकरवी धावबाद केले. ट्रिस्टन स्टब्सने 12 चेंडूंत 2 चौकार व एका षटकारासह नाबाद 24 धावांची खेळी केली, तर विप्रराज निगम एका धावेवर नाबाद राहिला. चेन्नईकडून खलील अहमदने 2, तर रवींद्र जाडेजा, नूर अहमद व मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.