DC Vs RCB – बंगळुरू रोखणार दिल्लीचा विजयरथ?

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू व दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या 18 व्या हंगामात जबरदस्त फॉर्मात आहेत. गुणतक्त्यात अव्वल स्थानावर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ उद्या, 10 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ रोखणार काय? याकडे तमाम क्रिकेटप्रेमींच्या नजरा असतील. स्पर्धेत एकमेव अजेय असलेल्या दिल्लीने विजयाची हॅटट्रिक साजरी केलेली आहे, तर दुसरीकडे बंगळुरूने चार लढतींत तीन विजय मिळविले आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना उद्या एक तुल्यबळ लढत बघायला मिळणार, एवढं नक्की.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आयपीएलचा 24 वा सामना रंगणार आहे. या लढतीत स्टार फलंदाज विराट कोहली व वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्प यांच्यातील द्वंद्वात कोण बाजी मारणार यावरही बरेच काही अवलंबून असेल. बंगळुरूने कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपरकिंग्ज व मुंबई इंडियन्स या बलाढय़ संघांचा पराभव केलाय. या संघाला केवळ गुजरात टायटन्स संघाकडूनच एकमेव पराभव पत्करावा लागला आहे. विराट कोहली फॉर्मात असल्याने बंगळुरूचे मनोबल उंचावलेले आहे, मात्र मिचेल स्टार्प व डावखुरा फिरकीपटू पुलदीप यादव यांच्यापुढे विराटचा कस लागणार आहे.

दिल्लीची राहुल, डू प्लेसिसवर मदार

अनुभवी फलंदाज लोकेश राहुलचा सुपर फॉर्म दिल्ली पॅपिटल्सचे मनोबल उंचावणारा आहे. चेन्नईविरुद्ध खेळू न शकलेला फाफ डू प्लेसिस फिट असल्यास दिल्लीला मोठा दिलासा मिळणार आहे, मात्र बंगळुरूकडे जोश हेझलवूड व भुवनेश्वर पुमार अशी अनुभवी वेगवान जोडगोळी आहे. पृणाल पंडय़ाची अष्टपैलू कामगिरीदेखील दिल्लीसाठी महत्त्वाची ठरणार आहे.