
एकाना क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दिल्लीविरुद्ध लखनऊ सामन्यात दिल्लीने आपलं नाणं खणखणीत वाजवत सामना एकतर्फी खिशात घातला. लखनऊने दिलेले 160 धावांचे आव्हान दिल्लीने 17.5 षटकांमध्ये फक्त 2 विकेट गमावत पूर्ण केले. सलामीला आलेल्या अभिषेक पोरेलने 36 चेंडूंमध्ये 51 धावा चोपून काढत धडाकेबाज सलामी दिली. नायर (15 धावा) स्वस्तात माघारी परतला. परंतु त्यानंतर के एल राहुल आणि अक्षर पटेल यांनी डाव सावरला आणि संघाला विजयाच्या दिशेने मार्गस्थ केले. राहुलने 42 चेंडूंमध्ये 3 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 57 धावा चोपून काढल्या. तसेच कर्णधार अक्षर पटेलनेही राहुलच्या सोबतीने आपले हात धुवून घेतले आणि 20 चेंडूमध्ये 4 खणखणीत षटकार आणि 1 चौकार मारत नाबाद 34 धावा केल्या. या विजयासह दिल्लीने 12 गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले आहे.