अखेर धोनीची चेन्नई पराभवमुक्त, पाच पराभवांच्या नामुष्कीनंतर चेन्नईचा पहिला विजय

अखेर पाच पराभवांच्या नामुष्कीनंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने चेन्नईला पराभवमुक्त केले. धावांचा पाठलाग करताना गेल्या चार सामन्यांत अपयशी ठरलेल्या चेन्नईला फिनीशर धोनीचा टच लाभला आणि शिवम दुबेच्या साथीने धोनीने 3 चेंडू राखून लखनौचा पराभव केला. या पराभवानंतरही चेन्नईचे गुणतालिकेतील दहावे स्थान कायम आहे.

धोनीने टॉस जिंकून लखनौला फलंदाजी दिली आणि लखनौला खलील अहमदने पहिल्याच षटकात धक्का दिला. एडन मार्करम (6) बाद झाल्यावर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा निकोलस पूरनही (8) प्रथमच लवकर बाद झाला. ऋषभ पंतने मिचेल मार्श (30), आयुष बदोनी (22) आणि अब्दुल समदबरोबर (20) भागीदाऱ्या रचत संघाला दीडशेचा टप्पा ओलांडून दिला. झंझावाती फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या पंतने 4 षटकार ठोकले तरी तो 49 चेंडूंत 63 धावाच करू शकला. त्यामुळे त्यांचा संघ अपेक्षेपेक्षा कमी धावसंख्या उभारू शकला.

दुबेधोनीमुळे चेन्नईचे विजयदर्शन

लखनौच्या 167 धावांचा पाठलाग करताना शेक राशीद (27) आणि रचिन रवींद्र (37) यांच्या 52 धावांच्या सलामीनंतर इम्पॅक्ट प्लेअर रवी बिश्नोईने राहुल त्रिपाठी (9) आणि रवींद्र जाडेजा (7) या दोघांना बाद करत 1बाद 74 वरून 4 बाद 96 असे चेन्नईला अडचणीत आणले. विजय शंकरही स्वस्तात बाद झाला. मात्र त्यानंतर शिवम दुबे आणि धोनीने सहाव्या विकेटसाठी 57 धावांची अभेद्य भागी रचत चेन्नईला पाच पराभवानंतर विजयाचे दर्शन घडवले. धोनीने 11 चेंडूंत 4 चौकार आणि एक षटकार खेचत 26 धावा ठोकल्या. हीच खेळी चेन्नईसाठी मॅचविनिंग ठरली. तर दुबेने सावध खेळ करत 37 चेंडूंत 43 धावा करत संघाच्या विजयावर चौकारानिशी शिक्कामोर्तब केले.