
आयपीएलमध्ये गेल्या 17 वर्षात बंगळुरूला (आरसीबी) चेपॉकवर चेन्नईला (सीएसके) नमवण्याचा पराक्रम करता आलेला नाही. मात्र रजत पाटीदारचा संघ 17 वर्षे अभेद्य असलेला चेन्नईचा चेपॉक किल्ला भेदण्यासाठी सज्ज झाला आहे.
चेन्नईने बंगळुरूविरुद्ध नेहमीच आपले वर्चस्व सिद्ध केलेय. उभय संघांमध्ये 33 सामन्यांत चेन्नईने 21 तर बंगळुरूला 11 सामन्यांत विजय नोंदवता आला आहे. एक सामना निकालात निघाला नव्हता. याचाच अर्थ उभय संघातील द्वंद्व अधिक चेन्नईनेच जिंकले आहेत. मात्र उद्घाटनीय सामन्यात गतविजेत्या कोलकात्याला धक्का दिल्यानंतर बंगळुरूचा उत्साह द्विगुणीत झाला असून त्यांनी चेपॉकवरील आपली पराभवाची
मालिका खंडित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे.
14 धावांनी जिंकला होता सामना
आयपीएलच्या पहिल्या मोसमात बंगळुरूने चेन्नईविरुद्ध चेपॉकवर खेळल्या गेलेल्या पहिल्याच सामन्यात चेन्नईचा 14 धावांनी पराभव केला होता. या सामन्यात खुद्द विराट कोहलीसुद्धा खेळला होता. त्यानंतर झालेल्या आठही सामन्यांत चेन्नईनेच बाजी मारली. आता तो इतिहास बदलण्यासाठी अवघा बंगळुरू सज्ज झाला आहे. बंगळुरूसाठी हे एक आव्हान आहे आणि ते वाटते तेवढे सोप्पे नाही. चेन्नईनेही आपल्या पहिल्या सामन्यात बलाढय़ मुंबईचा सहज पराभव करत दमदार सलामी दिली होती. त्यामुळे चेन्नई चेपॉकवर आपल्या विजयाची परंपरा कायम ठेवण्यासाठी उत्सुक आहे.
कोहलीवरच सर्वकाही
कोलकात्याविरुद्ध विराट कोहलीचीच बॅट तळपली होती आणि त्याने बंगळुरूला दमदार विजय मिळवून दिला होता. आताही बंगळुरूचे सर्वकाही कोहलीच्या फॉर्मवर अवलंबून आहे. फिरकीला सामोरे जाणे कोहलीसाठी पूर्वीसारखे सोप्पे राहिलेले नाही. पण संघाला विजय मिळवून देण्यासाठी कोहलीला आपल्या बॅटचा करिश्मा दाखवावाच लागेल. कोहलीबरोबर फिल सॉल्ट, रजत पाटीदार, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मासारखे धडाकेबाज फलंदाज आहेतच. चेन्नईसाठी रचिन रवींद्र, कर्णधार ऋतुराज गायकवाड यांच्याकडून जोरदार सलामीची अपेक्षा आहे.
फिरकी त्रिकुटाचा दरारा
चेन्नईची मदार फिरकी त्रिकुटावर आहे. रवींद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन आणि नूर अहमद हे तिन्ही चेन्नईचे मॅचविनर फिरकीवीर आहेत. नूरने सलामीच्याच सामन्यात आपली दहशत दाखवलीय. आता बंगळुरूलाही ते त्रास देणार हे निश्चित आहे. या तिघांनी मुंबईविरुद्ध 11 षटकांत 70 धावा देत पाच विकेट टिपल्या होत्या.
विराट कोहलीला न विचारताच त्याची बॅग उघडली, परफ्यूमही वापरला; चिकाराच्या वर्तनानं RCB चे खेळाडू हैराण
भुवनेश्वर, पथिरानाची वाट पाहताहेत
बंगळुरूला भुवनेश्वर कुमारच्या पुनरागमनाची आस लागलीय. पहिल्या सामन्यात तो खेळू शकला नव्हता. जर तो चेन्नईविरुद्ध फिट झाला तर बंगळुरूसाठी ती आनंदाची बाब असेल. दुसरीकडे चेन्नईसाठी मथिशा पथिरानाची उपस्थिती आवश्यक झालीय. मुंबईविरुद्ध चेन्नईच्या वेगवान गोलंदाजांना फारशी समाधानकारक कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे पथिरानाच्या फिटनेसवर चेन्नईचे लक्ष लागले आहे. जर तो फिट झाला तर नॅथन एलिसच्या जागी संघात दिसेल.
उभय संघांतील संभाव्य 12 जणांचा संघ
चेन्नई – रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, शिवम दुबे, सॅम करण, रवींद्र जाडेजा, महेंद्रसिंग धोनी, रविंचंद्रन अश्विन, नॅथन एलिस, नूर अहमद, खलील अहमद.
बंगळुरू – विराट कोहली, फिल सॉल्ट, रजत पाटीदार (कर्णधार), देवदत्त पडिक्कल/मोहित राठी, लियाम लिव्हिंगस्टन, जितेश शर्मा, टीम डेव्हिड, रसिक सलाम/भुवनेश्वर कुमार, जॉश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा.