दोन किंग्ज आज आमनेसामने, चेन्नई पराभवाची हॅटट्रिक रोखण्यासाठी पंजाबशी भिडणार

आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ अर्थातच चेन्नई सलग तीन सामन्यांत हरलाय. आपल्या पराभवाला रोखण्यासाठी चेन्नईचा कागदावर बलाढय़ वाटणारा संघ पंजाबशी पंगा घेणार आहे. गेल्या सामन्यात दोन्ही संघांना पराभवाची झळ बसली होती, मात्र आता विजयाची चव चाखण्यासाठी दोघेही उत्सुक आहेत. सज्ज आहेत. विजयाचे दान कोणत्या किंग्जच्या  पारडय़ात पडणार हे कामगिरीवर ठरेल.

पंजाबची फलंदाजीत ताकद

पंजाबच्या फलंदाजांनी पहिल्या दोन सामन्यांत जोरदार विजय नोंदवले होते. कर्णधार श्रेयस अय्यर, नेहाल वधेरा, शशांक सिंग यांनी मॅचविनिंग खेळय़ा केल्या आहेत. गुजरात आणि लखनौचा फडशा पाडल्यानंतर राजस्थानपुढे ते अपयशी ठरले होते. गोलंदाजीतही अर्शदीप सिंग आणि मार्को यान्सन प्रभावी मारा करताहेत; पण राजस्थानविरुद्ध त्यांची गोलंदाजीही फिकी ठरली होती. त्यामुळे स्पर्धेतला पहिला पराभव त्यांना झेलावा लागला होता. चेन्नईला त्यांना नमवणे फार अवघड नसले तरी पराभवाची हॅटट्रिक सहन करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची चेन्नई आपणच किंग्ज असल्याचे दाखवतील असे संकेत आहेत. पण आयपीएलमध्ये सारे अंदाज नेहमीच फोल ठरतात.

धोनीच्या फलंदाजीतला जोर संपला

चेन्नईसाठी यंदाचा मोसम फार निराशाजनक सुरू आहे. मुंबईविरुद्धचा सलामीच्या हायव्होल्टेज सामन्यात चेन्नईने विजयाची नोंद केली; मात्र त्यानंतर गेले दोन आठवडे ते केवळ हरतच आहेत. त्यांचा एकही फलंदाज संघाला विजयाच्या किनाऱ्यावर पोहोचवू शकलेला नाही. गेल्या दोन सामन्यांत तर खुद्द धोनीवर मॅच फिनिश करू देण्याची संधी होती, पण त्याला आपल्या फिनिशरच्या भूमिकेला न्याय देता आलेला नाही. त्यामुळे धोनीच्या फलंदाजीबाबतही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याच्या फटक्यात पहिल्याइतकी ताकद नसल्याचे वारंवार दिसले, पण चेन्नईचे संघव्यवस्थापन त्याच्या या फलंदाजीकडे काणाडोळा करत असल्याचे स्पष्ट जाणवतेय. हे चेन्नईसाठी महागडे ठरणार हे कुणीही सांगू शकतो.

चेन्नईच्या फलंदाजीकडे लक्ष

चेन्नईच्या रचिन रवींद्र, डेव्हन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे या धडाकेबाज फलंदाजांना आपल्या फलंदाजीत जराही सातत्य कायम राखता आलेले नाही. रचिन पहिल्या दोन सामन्यांत खेळला, पण गेल्या दोन सामन्यांत त्याचे अपयश संघासाठी घातक ठरलेय. हीच गोष्ट अन्य फलंदाजांसाठीही तितकीच लागू पडलीय. आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजी असलेल्या चेन्नईसाठी एखादा फलंदाजच उभा राहतोय. परिणामतः पराभवाने मारलेली मिठी त्यांचे गोलंदाजही सोडवण्यात अपयशी ठरत आहेत. त्यांची गोलंदाजी खूप भेदक आहे, पण सध्या त्यांना फलंदाजांची साथ मिळत नसल्यामुळे तेसुद्धा हतबल ठरले आहेत. आघाडीला खलील अहमद, मथिशा पथिराणा प्रतिस्पर्ध्यांवर तुटून पडताहेत. नूर अहमदची फिरकी, तर फलंदाजांची भंबेरी उडवत आहे; पण शेवटी सांघिक अपयश त्यांच्या माऱ्याला शून्य करत आहेत.