…हरले तर चेन्नईचा खेळ खल्लास, लखनौविरुद्ध करो या मरो लढत

आयपीएलचा 18 वा हंगाम चेन्नई सुपर किंग्जसाठी अत्यंत खडतर ठरलाय. सहा सामन्यांतील पाच सामने गमावल्यानंतर चेन्नईच्या ‘प्ले ऑफ’च्या आशा धुसर झाल्या आहेत. त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उद्या लखनौ सुपर जायंट्सला त्यांच्या घरच्या मैदानात पराभूत करण्याशिवाय चेन्नईकडे दुसरा पर्याय नाही. लखनौविरुद्ध हरले तर चेन्नईचा आयपीएलमधला खेळ खल्लास होईल म्हणजेच त्यांची प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता संपुष्टात येईल.

सहा सामन्यात पाच पराभवांमुळे सध्या चेन्नई सुपर किंगचा पाय खोलात गेला आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर पडल्याने पुन्हा एकदा कर्णधार पदाची धुरा महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.  त्यामुळे स्पर्धेतील आव्हान टिकवून ठेवण्यासाठी उर्वरीत सर्व सामन्यांमध्ये चेन्नईसाठी विजय अनिवार्य आहेत. सध्या सुमार गोलंदाजी आणि फलंदाजी ही चेन्नईसाठी डोकेदुखी ठरत आहे. रचिन रविंद्र, डेव्हेन कॉन्वे सारख्या दिग्गज फलंदाजांच्या बॅटमधून अद्याप धावा निघालेल्या नाहीत. तर, गोलंदाजीत देखील प्रभावी मारा होताना दिसत नाही. त्यामुळे उद्या लखनौविरुद्ध चेन्नईला गोलंदाजी आणि फलंदाजी प्रभावी करावीच लागेल.

दुसरीकडे ऋषभ पंतच्या नेतृत्वात लखनौला विजयाचा मार्ग गवसला आहे. सहा सामन्यांत चार विजयांसह लखनौ सध्या चौथ्या स्थानी आहे. लखनौने गेल्या 3 सामन्यात सलग विजय मिळवला असल्याने त्यांचे मनोधैर्य नक्कीच उंचावलेले असेल. तसेच, उद्याच्या सामन्यात त्यांना घरच्या मैदानावर खळत असल्याचा फायदा होऊ शकतो. लखनौचा निकलस पुरण, मिचेल मार्श सध्या तुफान फॉर्मात असून, उद्या तो चेन्नईच्या गोलंदाजांना आसमान दाखवणार यात तीळमात्र शंका नाही. तर, गोलंदाजीत देखील लखनौचे गोलंदाज प्रभावी गोलंदाजी करत आहेत. त्यामुळे तगडया लखनौला पराभूत करून पराभवाची मालिका खंडीत करण्याचे खडतर आव्हान चेन्नईसमोर असणार आहे. तर दुसरीकडे लखनौ सलग चौथ्या विजयाच्या शोधात मैदानावर उतरणार आहे.

उभय संघातील संभाव्य संघ

लखनौ संघ –  मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार), निकोलस पूरन, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आकाश दीप, एडन मार्कराम, आवेश खान, प्रिन्स यादव आणि दिग्वेश राठी.

चेन्नई संघ – महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉन्वे, रचिन रवींद्र, विजय शंकर, रवींद्र जाडेजा, शिवम दुबे, रवीचंद्रन अश्विन, मथिशा पथिराना, राहुल त्रिपाठी, खलील अहमद, नूर अहमद.

आयपीएल गुणतालिका

संघ       सा.    वि.     .       गुण               नेररे

गुजरात  6   4  2  8      1.081

दिल्ली   5   4  1  8      0.899

बंगळुरू   6   4  2  8      0.672

लखनौ    6   4  2  8      0.162

कोलकाता    6  3  3   6        0.803

पंजाब    5   3  2  6      0.065

मुंबई     6   2  4  4      0.104

राजस्थान    6  2  4   4 –      0.838

हैदराबाद    6  2  4   4 –      1.245

चेन्नई     6   1  5  2   – 1.554

टीप – सा.-ः सामना, वि.-ः विजय, .-ः पराभव, नेररे – नेट रनरेट (ही आकडेवारी मुंबईदिल्ली सामन्यापर्यंतची आहे.)