
कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने चेन्नई संघाची धुरा सांभाळल्यानंतरही त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. घरच्या मैदानावर खेळत असूनही कोलकात्याच्या गोलंदाजांनी चेन्नईला 20 षटकांत 109 धावांवरच रोखले आणि 110 धावांचे माफक आव्हान 10.1 षटकांत 2 विकेटच्या मोबदल्यातच गाठले. सुनील नरीनने अष्टपैलू खेळ दाखवताना आधी 13 धावांत चेन्नईच्या 3 फलंदाजांना टिपले आणि नंतर 18 चेंडूंत 5 षटकार आणि 2 चौकार ठोकत 44 धावा चोपल्या. तोच कोलकात्याच्या तिसऱ्या विजयाचा शिल्पकार ठरला.
18 वर्षांत पहिल्यांदाच पराभवाचा पंच
सलामीच्या सामन्यात मुंबईचा पराभव केल्यानंतर चेन्नईला सलग पाचव्या सामन्यात पराभवाची नामुष्की सहन करावी लागली आहे. विशेष म्हणजे पाचपैकी तीन सामने ते आपल्या घरच्या चेपॉकवर हरलेत. आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात या चॅम्पियन संघांवर ही लाजिरवाणी वेळ प्रथमच आली आहे. या सलग पाच पराभवांमुळे चेन्नईचे प्ले ऑफ गाठणे जवळजवळ कठीण होऊन बसले आहे. आयपीएलची प्ले ऑफ गाठण्यासाठी संघांना किमान आठ सामने जिंकावे लागतात. म्हणजेच आठपैकी सात सामने जिंकणे गरजेचे आहे.
61 चेंडूंत खेळ खल्लास
चेन्नईने दिलेल्या 104 धावांचा कोलकाता फडशा पाडणार, हे निश्चित होते. क्विंटन डिकॉकने 3 षटकार मारत 23 धावा काढल्या. 46 धावांची सलामी दिल्यानंतर सुनील नरीनने (44) फलंदाजीतही आग ओकताना 5 षटकार लगावत कोलकात्याला विजयासमीप नेले.
चेन्नईचा कासवछाप खेळ
चेन्नईची फलंदाजी टी-20 क्रिकेटला साजेशी नव्हती. त्यांच्या एकाही फलंदाजाला आक्रमक खेळ करता आला नाही. चेन्नईचा संघ जणू काही कसोटी क्रिकेटच खेळतोय की काय असा भास होत होता. चेन्नईने पूर्ण फलंदाजी केली, पण त्यांच्या डावात केवळ विजय शंकरलाच एकमेव षटकार ठोकता आला. त्याने 29 धावा केल्या तर शिवम दुबेने सर्वाधिक 31 धावा केल्या. डेव्हन कॉन्वे आणि रचिन रवींद्रची विकेट 16 धावांत गेल्यानंतर विजय शंकर आणि शिवम दुबेने 43 धावांची भागी रचत संघाला सावरले, पण विजय बाद झाल्यानंतर चेन्नईच्या डावाची पडझड कुणीही रोखू शकला नाही. वरुण चक्रवर्थी आणि सुनील नरीनच्या जादुई फिरकीने 2 बाद 59वरून चेन्नईची 9 बाद 79 अशी अवस्था केली. मग दुबेने शेवटपर्यंत किल्ला लढवत संघाला शंभरी गाठून दिली.