हैदराबाद बेल्ट मुंबई, परतीच्या लढतीतही मुंबईचा विजय; सनरायझर्सवर ‘बाद’ होण्याचे संकट

बोल्ड ऍण्ड डेंजरस मारा करणाऱया ट्रेंट बोल्टने हैदराबादला परतीच्या लढतीत बोल्ड करत मुंबईच्या विजयाचा चौकार साजरा केला. ट्रव्हिस हेड (0), अभिषेक शर्मा (8), इशान किशन (1) आणि नितीश रेड्डी (2) या आघाडीच्या 4 फलंदाजांनी ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहरच्या भेदकतेपुढे शरणागती पत्करली तेव्हाच हैदराबादने सामना गमावला होता, तर मुंबईने जिंकला होता. रोहित शर्माने हैदराबादमध्येही राजेशाही खेळ करताना 70 धावांची खेळी करत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 26 धावांत 4 विकेट टिपणारा बोल्ट मुंबईच्या विजयी चौकाराचा शिल्पकार ठरला.

रोहित-सूर्याचा धमाका

गेल्या सामन्यात चेन्नईच्या गोलंदाजीचा पालापाचोळा करणाऱया रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादवच्या बॅटने हैदराबादमध्येही धमाके करत मुंबईचा अपेक्षित विजय आणखी सोपा केला. गेल्या सामन्यात नाबाद 76 धावा ठोकणाऱया रोहितच्या बॅटने हैदराबादमध्येही आपली दादागिरी दाखवत 46 चेंडूंत 3 षटकार आणि 8 चौकारांचा घणाघात सादर केला. त्याला सूर्याच्या नाबाद 40 धावांचीही साथ लाभली. चेन्नईविरुद्ध 114 धावांची अभेद्य भागी रचणारी ही जोडी आजही नाबाद राहणार असे वाटत होते, पण रोहित बाद झाला. दोघांनी 53 धावांची भागी रचली. त्याआधी सलामीवीर रायन रिकल्टन (11) आजही अपयशी ठरला. मग विल जॅक्सच्या (22) मदतीने 64 धावांची भागी रचत रोहितने मुंबईला विजयाच्या वेगवान ट्रकवर ठेवले. रोहितच्या सलग दुसऱया सत्तरीमुळे मुंबईने 32 चेंडू आणि 7 विकेटनी सामना जिंकत गुणतालिकेत सहाव्या स्थानावरून थेट तिसऱया स्थानी झेप घेतली.

मुंबईने प्ले ऑफची चुरस वाढवली

पाचपैकी चार सामन्यांत पराभवाची चव चाखणाऱया मुंबईसाठी प्ले ऑफची शर्यत अवघड होती. पण त्यानंतर मुंबईने गेल्या चार सामन्यात हैदराबादचा दोनदा आणि चेन्नई-दिल्लीवर मात करत आयपीएलमध्ये कमबॅक केले. गेल्या वर्षी दहा पराभवांमुळे साखळीतच बाद झालेल्या मुंबईला आता प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुढील पाचपैकी तीन सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे मुंबईने प्ले ऑफची लढत आणखी चुरशीची केली आहे. सध्या दहाही संघांना प्ले ऑफची संधी असली तरी गुजरात-दिल्लीसाठी केवळ दोन विजय पुरेसे आहेत. तसेच बंगळुरू, पंजाब आणि लखनौ या संघांना तीन विजय प्ले ऑफमध्ये संधी देऊ शकतो. गतविजेत्या कोलकात्याला पुढील सहापैकी चार सामने जिंकणे गरजेचे आहे, तर चेन्नई, हैदराबादला प्रत्येक सामना जिंकावाच लागणार असल्यामुळे या दोन संघांसाठी प्ले ऑफची शर्यत खडतर झाली आहे.

25 चेंडूंतच खेळ खल्लास

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय ट्रेंट बोल्ट आणि दीपक चहरने योग्य ठरवला. बोल्टने आपल्या पहिल्याच षटकातील दुसऱयाच चेंडूवर ट्रव्हिसची विकेट काढत हैदराबादच्या फलंदाजीचे हेडच छाटले. मग दीपक चहरने इशान किशनची विकेट काढली. पुढच्या षटकांत बोल्टने अभिषेक शर्माला खेळपट्टीवर टिकण्याआधीच पॅव्हेलियनची वाट दाखवली. नितीश रेड्डीचा अडसर चहरने दूर करत सलग चार षटकांत हैदराबादच्या चार फलंदाजांना बाद करत त्यांचा खेळही खल्लास केला.

क्लासनची क्लासिक खेळी

13 धावांतच हैदराबादच्या फलंदाजीचे बारा वाजले होते. तेव्हा हेन्रीक क्लासन संघाचा संकटमोचक ठरला. त्याने आपला क्लासिक खेळ दाखवत अनिकेत वर्मासह 22 धावांची भागी रचली, पण अनिकेत बाद झाल्यावर अभिनव मनोहरबरोबर 99 धावांची भागी रचत त्याने संघाला सावरले. पण ते मुंबईच्या अचूक आणि भन्नाट माऱयासमोर मोठी धावसंख्या उभारू शकले नाहीत. क्लासनने 44 चेंडूंत 71 तर मनोहरने 37 चेंडूंत 43 धावा केल्या. बुमरानेही जोडी फोडली तर बोल्टने शेवटच्या षटकांत मनोहर आणि पॅट कमिन्सची विकेट काढत हैदराबादला दीडशतकी टप्पाही गाठू दिला नाही.