
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा त्यांच्या घरच्या मैदानावर सात विकेट्स आणि सात चेंडू राखून धुव्वा उडवीत आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत दोनच दिवसांत गतपराभवाचा बदला घेतला. कमालीची कंजूष गोलंदाजी, कडक क्षेत्ररक्षण आणि त्यानंतर ‘सामनावीर’ ठरलेला विराट कोहली व देवदत्त पडिक्कल यांची दमदार अर्धशतके ही बंगळुरूच्या विजयाची वैशिष्टय़े ठरली. एवढेच नव्हे, तर बंगळुरूने ‘आयपीएल’च्या गुणतक्त्यात तिसऱ्या स्थानी झेप घेतली.
चॅलेंजेबल गोलंदाजी अन् ‘रॉयल’ क्षेत्ररक्षण
दरम्यान, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जला रडतखडत 6 बाद 157 धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूच्या चॅलेंजेबल गोलंदाजीपुढे पंजाबच्या फलंदाजांना आक्रमक खेळ करता आला नाही. शिवाय कंजूष गोलंदाजीच्या दिमतीला ‘रॉयल’ क्षेत्ररक्षणाची साथ मिळाल्याने बंगळुरूपुढे पंजाबला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. ‘इम्पॅक्ट प्लेयर’ प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली. त्याने 17 चेंडूंत पाच चौकार अन् एक षटकार लगावला. प्रियांश आर्य (22), जोस इंग्लिस (29), शशांक सिंग (नाबाद 31) व माकाx जॅन्सेन (नाबाद 20) यांनी बंगळुरूच्या गोलंदाजीपुढे तग धरल्याने पंजाबला दीडशे धावांचा टप्पा ओलांडता आला. प्रभसिमरन सिंग व प्रियांश आर्य या सलामीच्या जोडीला कृणाल पंडय़ाने डेव्हिडकरवी झेलबाद केले. रोमारिओ शेफर्डच्या गोलंदाजीवर पंडय़ाने कर्णधार श्रेयस अय्यरचा (6) अफलातून झेल टिपला. नेहाल वढेरा (5) डेव्हिड आणि कोहली यांच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे यष्टिरक्षक जितेश शर्माकरवी धावबाद झाला. सुयश शर्माने जोस इंग्लिस व मार्कस स्टोइनिस (1) यांचे दांडके उडवून पंजाबच्या गोलंदाजीला लगाम घातला. मात्र शशांक सिंह व मार्को जॅन्सेन यांनी सातव्या विकेटसाठी 37 चेंडूंत 43 धावांची अभेद्य भागीदारी करीत पंजाबला दीडशेपार नेले. बंगळुरूकडून कृणाल पंडय़ा व इम्पॅक्ट प्लेअर सुयश शर्मा यांनी दोन-दोन फलंदाज बाद केले, तर रोमारियो शेफर्डला एक बळी मिळाला.
कोहली-पडिक्कल जोडीची शतकी भागीदारी
पावसाच्या व्यत्ययात झालेल्या या लढतीत पंजाबकडून मिळालेले 158 धावांचे लक्ष्य बंगळुरूने 18.5 षटकांत केवळ तीन फलंदाजांच्या मोबदल्यात 159 धावा करीत सहज पूर्ण केले. फिल सॉल्ट (1) पहिल्याच षटकात माघारी परतल्याने बंगळुरूची सुरुवात तशी निराशाजनक झाली होती. अर्शदीप सिंगने त्याला यष्टीमागे इंग्लिसकरवी झेलबाद केले, मात्र त्यानंतर चेस मास्टर विराट कोहली (नाबाद 73) व इम्पॅक्ट प्लेयर देवदत्त पडिक्कल (61) यांनी दुसऱ्या विकेटसाठी 69 चेंडूंत 103 धावांची भागीदारी करीत बंगळुरूला विजयाच्या मार्गावर आणले. पडिक्कलने 35 चेंडूंत पाच सणसणीत चौकार अन् चार टोलेजंग षटकार ठोकले. हरप्रीत ब्रारने त्याला वढेराकरवी झेलबाद केले. पडिक्कलच्या जागी आलेला कर्णधार रजत पाटीदार आज अपयशी ठरला. युझवेंद्र चहलने त्याला केवळ 12 धावांवर खेळत असताना जानसेनकडे झेल देण्यास भाग पाडले. मग विराट कोहलीने आलेल्या जितेश शर्माच्या (नाबाद 11) साथीत बंगळुरूच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. कोहलीच्या 54 चेंडूंतील नाबाद 73 धावांच्या खेळीला एका षटकारासह सात चौकारांचा साज होता. पंजाबकडून अर्शदीप सिंग, हरप्रीत ब्रार व युझवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक बळी टिपला.
कोहलीचा आणखी एक विक्रम
क्रिकेटविश्वात ‘रन’मशीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विराट कोहलीने आपल्या कारकीर्दीत आणखी एक मैलाचा दगड पार केला. ‘आयपीएल’मध्ये सर्वाधिक वेळा 50 धावा करणारा तो ‘नंबर वन’ फलंदाज बनलाय. विराटने 67 वेळा 50 हून अधिक धावा करीत डेव्हिड वॉर्नरचा 66 वेळा 50 हून अधिक धावा करण्याचा विक्रम मोडीत काढला. आयपीएलमध्ये विराटच्या नावावर आठ शतकेही आहेत.